Covid 19 : सिंगापूर, हाँगकाँगसारख्या आशियाई देशांमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यानंतर भारतातही कोरोनाची सौम्य पण स्पष्ट चाहूल लागली आहे. 19 मे 2025 पर्यंत देशात एकूण 257 सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत आणि कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडलेली नाही.
हाय लेव्हल बैठक घेऊन तयारीचा आढावा
केंद्र सरकारने परिस्थिती गांभीर्याने घेत, सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत NCDC, ICMR, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि केंद्र शासनाच्या प्रमुख रुग्णालयांतील तज्ज्ञांनी भाग घेतला. या बैठकीत देशातील कोविड परिस्थिती, जीनोम सिक्वेन्सिंग आणि आरोग्य यंत्रणेची (Covid 19) तयारी याचा आढावा घेण्यात आला.
कोणता वेरिएंट सध्या सक्रिय आहे? (Covid 19)
सध्या भारतात आढळणारा वेरिएंट म्हणजे JN.1 जो ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. या वेरिएंटची लक्षणे आधीच्या लाटांप्रमाणेच आहेत – कोरडी खोकला, चव किंवा वास जाणे, डोकेदुखी आणि सौम्य ताप.
तज्ज्ञ काय म्हणतात?
फोर्टिस नोएडाचे पल्मनोलॉजिस्ट डॉ. मयंक सक्सेना सांगतात, “कोविडचे प्रमाण वाढत असले तरी घाबरण्याचे कारण नाही. पण जुने उपाय पुन्हा अमलात आणणं गरजेचं आहे – मास्क घालणं, वारंवार हात धुणं आणि गर्दीपासून दूर राहणं. हे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे.”
भारताची वैद्यकीय यंत्रणा कितपत तयार आहे?
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (IDSP) आणि ICMR च्या मार्गदर्शनाखाली जीनोम सिक्वेन्सिंग सुरु असून सर्व संभाव्य संक्रमणावर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. राज्य सरकारांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
गर्मीच्या सुट्ट्यांत विशेष काळजी घ्या
डॉ. सक्सेना पुढे सांगतात की, “गर्मीच्या सुट्ट्यांमुळे प्रवासाचा सत्र जोरात आहे. त्यामुळे हॉटस्पॉट क्षेत्र टाळणं, मास्क वापरणं, आणि लक्षणं दिसल्यास टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.”
नवीन लाट येण्याची शक्यता कमी
सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. मोहसिन वली यांनी स्पष्ट केलं की, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये पसरत असलेले LF.7 आणि NB.1.8 हे वेरिएंट भारतात यापूर्वी आलेल्या वेरिएंटपासून फारसे वेगळे नाहीत. त्यामुळे गंभीर परिणामांची शक्यता कमी आहे. “आपली यंत्रणा सज्ज आहे, पण नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे,” असं ते म्हणाले.
सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सल्ला
- फ्लू सारखी लक्षणं (ताप, खोकला, थकवा) आढळल्यास टेस्ट करून घ्या
- ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि गंभीर आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्या
- सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला आणि सॅनिटायझर वापरा
- अफवांपासून सावध रहा, केवळ सरकारी किंवा खात्रीशीर स्रोतांवर विश्वास ठेवा
कोविड आता आपल्या दरवाज्यावर येत नसलं तरी सावध राहणं हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही, पण ‘जागरूक नागरिक’ होणं आजची गरज आहे.




