Daily limit on UPI: फोन पे, गुगल पे, पेटीएमसारख्या UPI अॅप्सद्वारे रोज व्यवहार करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नुकताच एक आदेश काढला असून त्यानुसार १ ऑगस्ट २०२५ पासून UPI व्यवहारांवर (Daily limit on UPI) अनेक मर्यादा लागू होणार आहेत. या बदलामुळे UPI वापरण्याची सवय आणि पद्धत दोन्ही मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.
कशा प्रकारच्या सेवा होणार मर्यादित?
NPCI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक बॅलन्स तपासणे, ऑटोपे साठी परवानगी देणे, व्यवहाराची स्थिती पाहणे यांसारख्या सेवा आता एका ठराविक मर्यादेच्या आतच करता येतील. अनेक वेळा ग्राहक वारंवार या सेवा वापरत असल्याने UPI नेटवर्कवर ताण निर्माण होत होता.
दररोज ५० वेळाच बॅलन्स तपासता येणार (Daily limit on UPI)
जर तुम्ही वारंवार बँक बॅलन्स तपासत असाल, तर आता ते शक्य होणार नाही. १ ऑगस्टपासून तुम्ही एका दिवसात केवळ ५० वेळाच बँक बॅलन्स तपासू शकणार आहात. Ezeepay चे COO मुशर्रफ हुसैन यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, “हा नियम व्यापाऱ्यांसाठी काहीसा अडचणीचा ठरू शकतो, पण UPI नेटवर्कचा स्थायित्व राखण्यासाठी तो आवश्यक आहे.”
पीक अवर्समध्ये मर्यादा अधिक कठोर
NPCI च्या सूचनेनुसार, सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या कालावधीत बँक बॅलन्स तपासण्यावर कडक मर्यादा असतील. यावेळी ही सेवा काही अॅप्समध्ये बंद देखील राहू शकते. यासोबतच, प्रत्येक व्यवहारानंतर बँकांनी ग्राहकांना बॅलन्स अपडेटची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ऑटोपे फक्त नॉन-पीक अवर्समध्ये
Netflix, SIP किंवा इतर सबस्क्रिप्शनसाठी UPI ऑटोपे वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही नियम बदलले आहेत. आता ऑथरायझेशन आणि डेबिट प्रक्रिया फक्त नॉन-पीक अवर्समध्येच होऊ शकतील. यामुळे बॅकएंडवर होणाऱ्या लोडमध्ये घट होईल.
UPI नेटवर्कवरील ताण कमी करणे हा उद्देश
गेल्या काही महिन्यांमध्ये UPI सेवा वारंवार बंद पडण्याच्या घटना समोर आल्या होत्या. यामुळे NPCI कडून ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. सुरुवातीला UPI सेवा वापरावर शुल्क लावण्याचा विचार केला गेला होता, मात्र त्याऐवजी आता पीक टाइममध्ये सेवा मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.