Dehydration : उन्हाळ्यात होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास; कशी काळजी घ्याल? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dehydration) नुकतेच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी सगळ्यात जास्त घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ज्याचा परिणाम आपल्या शरीरातील अवयवांवर आणि त्यांच्या कामावर होतो.

(Dehydration) आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर त्याचा परिणाम थेट रक्तवाहिन्या, रक्ताभिसरण, पेशी, मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंडाच्या कार्यावर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागेल तेव्हढेच पाणी शरीराला पुरत नाही. यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होऊन अनेक आजार होण्याची शक्यता बळावते. म्हणूनच आज आपण डिहायड्रेशनच्या समस्येविषयी काही महत्वाची माहिती देत आहोत.

डिहायड्रेशनची मुख्य लक्षणे

 • घशाला कोरडं पडणे.
 • सतत तहान लागणे.
 • डोकेदुखी.
 • चक्कर येणे.
 • स्नायूंमध्ये वेदना आणि अंगदुखी.
 • अशक्तपणा वाटणे.
 • लघवीचे प्रमाण कमी होणे.
 • लघवीचा रंग गडद पिवळा होणे.
 • त्वचा कोरडी आणि निस्तेज होणे.
 • मलावरोध होणे.

ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. तर गंभीर लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश आहे. (Dehydration)

 • हृदयाचे ठोके वाढणे.
 • रक्तदाब कमी होणे.
 • वजन झपाट्याने कमी होणे.
 • अचानक ताप येणे.
 • उलट्या होणे.
 • जुलाब होणे.

डिहायड्रेशन का होते? (Dehydration)

डिहायड्रेशन होण्याचे मुख्य कारण एखादे आजारपण असू शकते. जसे की, जुलाब वा अतिसार झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील पाण्याची मात्रा प्रचंड कमी होते. परिणामी या व्यक्तीला डिहायड्रेशनची समस्या जाणवते. तसेच उन्हाळ्याबाबत बोलायचे झाले तर शक्तीचा अधिक वापर करावा लागेल अशी कामं करणे, अति व्यायाम करणे आणि मुख्य म्हणजे कमी पाणी पिण्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाईड्स, सोडियम, पोटॅशिअम, क्लोराईड यांच्या पातळीमध्ये असमतोल किंवा कमतरता असल्याने देखील डिहायड्रेशनची समस्या होते.

उन्हाळ्यात डिहायड्रेशन झाल्यास काय उपाय करता येतात?

डिहायड्रेश हा काही आजार नाही. त्यामुळे यावरील उपाय अत्यंत सामान्य आणि सोपे आहेत. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

 1. डिहायड्रेशनवरील सर्वात महत्वाचा आणि मुख्य उपाय म्हणजे सतत पाणी पिणे. दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने काही काळातच डिहायड्रेशनची समस्या दूर होईल. मात्र ही सवय अंगीकारणे गरजेचे आहे. (Dehydration)
 2. उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर नियमित पाणी आणि रसदार फळांचे सेवन करा. तसेच शहाळ्याचे पाणी किंवा लिंबाचे पाणी पिणे अत्यंत लाभदायी ठरते. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते.
 3. उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर १ ग्लास पाण्यामध्ये साखर, चिमूटभर मीठ आणि ओआरएस टाकून प्या. यामुळे डिहायड्रेशन कमी होते आणि लगेच आराम मिळतो.
 4. याशिवाय आपल्या आहारात दही किंवा ताकाचा समावेश केल्यास उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
 5. (Dehydration) उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनची समस्या टाळायची असेल तर कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, आवळा, स्ट्रॉबेरी, काकडी, कांदा, टोमॅटो, पालक, मुळा, गाजर यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.