पुण्यातील निमगाव खंडोबा मंदिराचा होणार विकास ; 24 एकर शासकीय जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून विविध निर्णय घेतले जात आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्याच्या महसूल व वन विभागाने काल दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदिराचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी येथील परिसरातील शंभर कोटी रुपये किमतीची 24 एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला.

निमगाव खंडोबा मंदिरासाठी राज्य आणि बाहेरच्या राज्यातून सुद्धा अनेक भाविक भक्त याठिकाणी येत असतात. हीच बाब लक्षात घेऊन मंदीर देवस्थान परिसराचा रोपवे व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यात येणार असून तेथील आध्यात्मिक, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या महसूल व वन विभागाने काल दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मौजे निमगाव येथील गट क्रमांक 135 मधील 14 हे. 40 आर. गायरान आणि शासकीय जमीन रोपवे व सार्वजनिक सुविधांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे मोफत वर्ग करण्यात आली आहे. जमिनीचा ताबा घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर सुरू करणे तसेच या भागात वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे.

या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आणि प्रयत्नशील होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मौजे निमगाव येथील 24 एकर शासकीय गायरान जमिन निमगाव खंडोबा मंदीर देवस्थान परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला.