हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ekiv Waterfall) पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य हजारो पटीने वाढलेले असते. त्यामुळे न केवळ माणसे तर वन्य जीव, पशु, पक्षी आणि झाडेसुद्धा सुखावलेली असतात. त्यात डोंगर कपाऱ्यांमध्ये तर निसर्गाची वेगळीच शाळा भरलेली असते. गर्द हिरवाई, छोटे मोठे धबधबे, शुभ्र धुक्याची चादर आणि पाण्याने भरलेले तलाव पाहण्यात कधी मन रमून जातं तेच कळत नाही. पावसाच्या दिवसात निसर्गाशी अगदी जवळून मैत्री करण्याची चांगली संधी मिळते. त्यामुळे बरेच निसर्गप्रेमी या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जाणे पसंत करतात. अशातच भर पावसाच्या दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील एकीव धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. याच धबधब्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
एकीव धबधबा (Ekiv Waterfall)
राजधानी सातारामधील जावळी तालुक्याला निसर्गाचा आशीर्वाद आहे. त्याच आशीर्वादाचा एक भाग म्हणजे एकीव धबधबा. पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बरसणाऱ्या धो- धो पावसामुळे अनेक धबधबे ओसंडून वाहत असतात. पण मेढ्याच्या पश्चिमेला असलेला एकीवचा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो. हा धबधबा दोन टप्प्यांत कोसळतो आणि पर्यटकांसाठी अत्यंत सुंदर तसेच विहंगम दृश्य निर्मिती करतो. कासकडून येणाऱ्या पाण्याने हा तयार झालेला हा धबधबा दुंद गावाच्या वरच्या बाजूला कोसळतो.
अलौकिक सौंदर्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध
पावसाळ्यात एकीव धबधब्याचे सौंदर्य इतके वाढते की, पर्यटकांची मोठी गर्दी होते. कासला जाताना अगदी जवळच हा धबधबा असल्याने इथे आवजून पर्यटक येतात. (Ekiv Waterfall) नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला हा धबधबा पंचक्रोशीत ‘पाबळ’ नावाने ओळखला जातो. या धबधब्याचा वरचा भाग सुरक्षित असून इथे भिजता येते. मात्र, खालचा भाग दुरून पाहावा लागतो. कारण इथे पाण्याचा विसर्ग इतका जास्त असतो की, पाण्यात उतरणे अशक्य.
कसे जाल?
साताऱ्याकडून कास रस्त्यावर आटाळी गावाजवळून एकीव धबधब्याकडे रस्ता जातो. मेढ्यातून कुसुंबी- दुदमार्गे या धबधब्याकडे जाता येते. दरम्यान, दोन्ही रस्ते सुस्थितीत असल्याने कण्हेर धरणाचे आणि डोंगरदऱ्यांचे मनमोहक दृश्यदेखील आपल्याला पहायला मिळते. (Ekiv Waterfall)