Elon Musk India Entry : महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः साताऱ्यासाठी एक मोठी औद्योगिक घडामोड समोर आली आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती ईलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने सातारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) प्लांट उभारण्यासाठी जमीन पाहणी सुरू केली आहे. ही माहिती राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विशेष म्हणजे, सातारा हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे या प्रकल्पाला राजकीय पाठींबाही मिळण्याची शक्यता आहे.
ही बातमी अधिक महत्त्वाची ठरते कारण टेस्ला इंडियाचे चेअरमन प्रशांत मेनन यांनी नुकतेच राजीनामा दिला असून, आता भारतातील कामकाज टेस्लाची चीनमधील टीम सांभाळणार (Elon Musk India Entry) आहे.असे असतानाही, भारतात टेस्लाचा प्रवेश निश्चित मानला जात आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत (मार्च 2026 पूर्वी) कंपनी भारतात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करू शकते.
पुण्याऐवजी सातारा का?
पूर्वी टेस्लाने पुणे जवळील चाकण व चिखली भागात प्रकल्पासाठी जागा तपासली होती. चाकण हे भारतातील प्रमुख ऑटो हब आहे, जिथे मर्सिडीज, टाटा, महिंद्रा, बजाज यांचे मोठे प्लांट आहेत. मात्र, टेस्लाने आता सातारावर लक्ष केंद्रित केले आहे. याचे कारण म्हणजे येथे आधीपासून कूपर कॉर्पोरेशनसारखे वाहन घटक निर्माते अस्तित्वात आहेत, तसेच लॉजिस्टिकदृष्ट्या मुंबई-पुण्याशी जवळीक आहे.
साताऱ्यातील प्लांटची खास वैशिष्ट्ये
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टेस्ला येथे CKD (Completely Knocked Down) असेंबली युनिट स्थापन करणार आहे, जिथे गाड्या भारतात असेंबल होतील. यासाठी कंपनीने साताऱ्याजवळील मोठा भूखंड ‘क्लोज टू फाइनलाइज’ केला आहे. मात्र, जागेचा नेमका आकार आणि लॉजिस्टिक तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत.
कोणत्या कंपनीसोबत होणार भागीदारी?
पूर्वी मेघा इंजिनीयरिंगसोबत टेस्लाची भागीदारीची चर्चा झाली होती, परंतु ती यशस्वी झाली नाही. सध्या टेस्ला एका जबाबदार भारतीय रिअल इस्टेट पार्टनरची शोधाशोध करत आहे, ज्याच्या माध्यमातून जमीन हस्तांतरण आणि प्रकल्पाची अंमलबजावणी होईल.
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे फायदा?
भारत आणि अमेरिका यांच्यात चाललेल्या वाहन शुल्क सवलतीच्या व्यापार करारामुळे टेस्लाला मोठा फायदा होऊ शकतो. भारत सरकार EV उद्योगाला चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्याच्या तयारीत आहे. तसेच, टेस्लाने आधीच मुंबईत शोरूमसाठी जागा घेतली असून तेथून देशभरात गाड्यांची विक्री सुरू होणार आहे. साताऱ्यात टेस्ला प्लांट उभारल्यास तो महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर एक नवा टप्पा ठरेल. रोजगार, गुंतवणूक आणि EV क्षेत्रातील क्रांती याला मोठा बळ मिळेल. एलॉन मस्कची ही ‘इंडियन एंट्री’ निश्चितच भविष्यात ऐतिहासिक ठरणार आहे




