हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Falgu River) आपल्या देशात अनेक रहस्य दडलेली आहेत. ज्यांपैकी काही रहस्यांची टोटल अद्याप विज्ञानाला सुद्धा लागलेली नाही. अशाच एका अनोख्या आणि अद्भुत नदीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. देशात अनेक नद्या आहेत. ज्यांच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्याने अनेक राज्य, जिल्हे आणि लहान मोठी गावं समृद्ध आहेत. मात्र, आपल्या देशात एक अशीही नदी आहे जी वर्षभर कोरडी असते आणि तरीही वाहते. होय. कारण या नदीचा प्रवाह जमिनीच्या आतून जातो. शिवाय या नदीचा रामायणाशी संबंध सांगितला जातो. अशी ही अद्भुत नदी कोणती आणि तीचे स्थान कोठे आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
रहस्यमयी नदी (Falgu River)
या रहस्यमयी आणि अद्भुत नदीचे नाव फाल्गु नदी असे आहे. जी बिहारमधील गया येथे वाहते. ही नदी वर वर कोरडी दिसते. मात्र, या नदीचा प्रवाह जमिनीच्या आतून वाहतो. येथे येणारे भाविक जमीनीच्या आतून वाळू उखरून नदीचे पाणी काढतात आणि त्यानंतर आपल्या पूर्वजांना प्रार्थना करतात. ही पूर्वीपारची मान्यता आहे. जी आजही जशीच्या तशी आहे. ही नदी जमीनीच्या आतून वाहत असल्याने तिला ‘अंत सलिला’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे या अंता सलीलावर लोकांची अढळ श्रद्धा आहे. या नदीचा इतिहास सांगणारे जाणकार सांगतात की, या नदीचा रामायणाशी खास संबंध आहे. याविषयी जाणून घेऊ.
रामायणाशी काय संबंध?
मोक्षनगरी अशी ओळख असलेल्या बिहारमधील गया जिल्ह्यात विष्णुपद मंदिराच्या काठी ही नदी वाहते. मात्र, तरीही या नदीत पाण्याचा साठा राहत नाही. याचे कारण, देवी सीतेचा शाप सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांचे पिता राजा दशरथ यांच्या निधनानंतर पिंडदान करण्यासाठी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह गयाधामला गेले होते. (Falgu River) त्यावेळी प्रभू श्रीराम हे बंधु लक्ष्मणासह काही साहित्य गोळा करण्यासाठी निघाले असताना आकाशातून एक आकाशवाणी झाली. ज्यात त्यांना पिंड दान करण्याची वेळ सांगितली गेली. आकाशवाणी ऐकून देवी सीतेने सासऱ्यांचे पिंड दान अर्पण करीत गाय, कावळा, पंडित आणि फाल्गु नदीला साक्षी मानले.
जेव्हा प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मणसोबत परतले तेव्हा पिंडदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. ते पाहून प्रभू श्रीरामांनी घडलेल्या प्रकाराबाबत देवी सीतेला विचारणा केली. तेव्हा देवी सीतेने पंडित, गाय, कावळा आणि फाल्गु नदीला साक्षीदार म्हणून संबोधले आणि घडलेली कथा सांगितली. (Falgu River) मात्र, प्रभू श्री रामांनी जेव्हा पित्याच्या पिंड दानाबद्दल महत्वाचे ४ प्रश्न विचारले तेव्हा फाल्गु नदीने खोटे सांगितले की, माता सीतेने पिंड दान केले नाही. हे ऐकून देवी सीतेला राग अनावर झाला आणि त्यांनी फाल्गु नदीला शाप दिला. तेव्हापासून फाल्गु नदी आटली आणि त्यानंतर भूगर्भातून वाहू लागली, अशी ही आख्यायिका आहे.
फाल्गु नदीच्या तीरावर पिंडदान केल्यास होतो सात पिढ्यांचा उद्धार
फाल्गु नदीला देवी सीतेचा शाप असला तरीही पिंड दानासाठी या नदीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जो कुणी फाल्गु नदीच्या तीरावर पिंडदान आणि तर्पण अर्पण करेल त्याच्या पूर्वजांना गतीने मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. तसेच या ठिकाणी पिंडदान अर्पण केल्याने कुटुंबातील सात पिढ्यांचा उद्धार होतो आणि पिंड दान करणारा स्वतः परम स्थिती प्राप्त करतो. (Falgu River) त्यामुळे संपूर्ण देशभरात श्राद्धासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ५५ स्थळांमध्ये बिहारमधील गया हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते.