हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले एक प्रमुख पर्यटनस्थळ असून, येथे निसर्गरम्य दृश्ये, ऐतिहासिक वारसा, धार्मिक स्थळे, आणि किल्ले यांचा अनोखा संगम आहे. अनेक पर्यटक पावसाळ्यात अशा ठिकाणांना भेट देताना दिसतात. काही किल्ले जोरदार पडणाऱ्या पावसामुळे बंद ठेवण्यात येतात. शिवकालीन आणि अनेक इतिहासकालीन गोष्टींची साक्ष देणारे किल्ले आजही पर्यटकाना भारावून टाकतात . अशा ठिकाणी पर्यटक भेट देऊन आनंद लुटत असतात . पण बऱ्याच महिन्यापासून मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यास बंद ठेवण्यात आला होता . आता तो पुन्हा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे.
भक्कम बांधकाम अजूनही कायम
मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड शहराजवळ अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला शिवकालीन काळातील एक अजिंक्य किल्ला मानला जातो, कारण आजपर्यंत हा किल्ला कधीही जिंकता आलेला नाही. सिद्दी लोकांनी बांधलेला असून , हा 22 एकरांमध्ये पसरलेला आहे. हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये बुडालेला असूनही त्याचे भक्कम बांधकाम अजूनही कायम आहे. पावसाळ्यामुळे हा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता . आता तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
किल्याची वैशिष्ट्ये
या किल्याच्या बांधकामाची वैशिष्ट्ये म्हणजे समुद्राच्या मधोमध उभा असलेल्या या किल्ल्याने नेहमीच शत्रूंपासून संरक्षण केले आहे . मुरुड जंजिरा किल्ल्याला तीन प्रमुख दरवाजे आहेत, त्यापैकी मुख्य दरवाजा समुद्रकिनाऱ्यापासून नजरेस पडत नाही, हे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. किल्याच्या आत बऱ्याच जुन्या तोफा, राजवाडे, तलाव आणि पाण्याचे टाके आहेत. हा किल्ला इतिहासाची साक्ष देतो . येथील कळाल बांगडी नावाची तोफ प्रसिद्ध आहे.
देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी
मुरुड जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना राजपुरी गावातून शिडाच्या होडीने प्रवास करावा लागतो. हा किल्ला पाण्यात असल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी पाहण्यास मिळते. पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंद असतो, परंतु इतर काळात हा किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो आणि जलवाहतूक सुरू असते. हा किल्ला अतिशय लोकप्रिय असून , येथे इतिहासप्रेमी आणि समुद्रकिनाऱ्यावरील किल्याचा आनंद घेणारे आवर्जून भेट देतात. तसेच हा किल्ला मुंबईपासून साधारण 165 किलोमीटर अंतरावर असून , देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. पर्यटनाच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा असून अलिबागच्या आकर्षणांपैकी एक मानला जातो.
ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटकांसाठी खुला
मे पासून बंद असलेला किल्ला ऑक्टोबर महिन्यात पुन्हा खुला झाल्याने, पर्यटकांना त्यांच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्हाला या काळात एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास मुरुड जंजिरा किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.