Chemical Fertilizers Price Increase : रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ ; शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षातील हि बातमी महत्वाची ठरणार आहे. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ (Chemical Fertilizers Price Increase) झाली आहे. खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारीपासून खतांच्या किमतीत 200 ते 300 रुपयांची वाढ केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. यामध्ये युरियाचे दर स्थिर असले तरी डीएपी (Diammonium phosphate), टीएसपी (TSP) आणि मिश्र खतांच्या किमती गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर चला या दरवाढीबदल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रासायनिक खतांच्या किमतीत वाढ – Chemical Fertilizers Price Increase

अगोदरच बाजारात शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना खतांच्या वाढलेल्या दरांचा फटका बसला आहे. डीएपी खताचा दर 1350 रुपयांवरून 1590 रुपये प्रति पोते झाला आहे. टीएसपी 46 टक्के खताचा दर 1300 रुपयांवरून 1350 रुपयांवर गेला आहे. तसेच 10.26.26 आणि 12.32.16 या मिश्र खतांच्या किमती अनुक्रमे 1725 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांची चिंता वाढली –

मागील खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतीच्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. पण वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना पाच-सहा पोत्यांच्या ऐवजी दोनच पोती खते वापरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे –

रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या वाढीचा (Chemical Fertilizers Price Increase) तातडीने विचार करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतकऱ्यांनी हे मत मांडले आहे. जर लवकरच शासनाने योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर अनेक शेतकरी शेतीपासून दूर जाण्याचा विचार करू शकतात. या संकटामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे