हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ट्रान्सफर पॉलिसीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मंत्रालयाने बँकांना बदली धोरणात अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने विविध सूचना दिल्या असून , आगामी 2025-26 वर्षापासून या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
2025-26 पासून पॉलिसीची अंमलबजावणी –
2025-26 वर्षापासून ट्रान्सफर पॉलिसीची अंमलबजावणी होणार आहे. बँकांच्या प्रमुखांना दिलेल्या सूचनांमध्ये वित्तीय सेवा विभागाने बँकांना त्यांच्या ट्रान्सफर पॉलिसीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. या सुधारित धोरणाचा हेतू बँकांच्या कामकाजात पारदर्शकता वाढविणे, तसेच एकसमान धोरण तयार करणे हा असून, संबंधित ट्रान्सफर पॉलिसी मंडळाच्या मान्यतेने लागू केली जाईल.
महिलांना विशेष लाभ –
नवीन धोरणात महिलांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाने बँकांना महिला कर्मचाऱ्यांची बदली शक्यतो त्यांच्या जवळच्या ठिकाणी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ट्रान्सफर प्रक्रिया अधिक स्वयंचलित करण्याचे तसेच कर्मचाऱ्यांना स्थान निवडीसाठी ऑनलाइन सुविधा देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
ट्रान्सफर प्रक्रिया अधिक सुलभ –
बँकांना सांगण्यात आले आहे कि , त्यांना वर्षाच्या मध्यात म्हणजेच जूनच्या आत ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. फक्त बढती किंवा प्रशासकीय कारणास्तव आवश्यक असलेल्या ट्रान्सफरला वगळता, प्रत्येक वर्षी एकसमान वेळेत या प्रक्रियेचे नियमन करण्यात येईल. वित्त मंत्रालयाने या सुधारणांमुळे कर्मचार्यांची बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक, न्याय्य आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.