हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंदीची स्थिती पाहता आर्थिक नियोजन करणे अतिशय महत्वाचे असते . त्यामुळे पगारामधून थोडे पैसे बाजूला काढून बचत करणे हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो . पण महिना संपायच्या आठवड्यात अनेकांचे खिशे रिकामे होतात , त्याचाच परिमाण म्हणजे आर्थिक नियोजन गोंधळते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला बचत कशी करावी हे सांगणार आहोत . ज्यामुळे तुमची गुंतवणूक अधिक होऊन , खर्च कमी होण्यास मदत मिळेल आणि त्या बचतीचा फायदा भविष्यकाळातील नियोजनासाठी उपयोगी ठरेल. तर चला जाणून घेऊयात त्याबद्दल अधिक माहिती.
पगाराचे विभाजन करा
तुम्ही तुमच्या पगाराचे वेगवेगळ्या भागात विभाजन करणे गरजेचे असते. त्यासाठी पगाराचा 50 टक्के भाग दैनंदिन खर्चासाठी, 30 टक्के बचतीसाठी आणि 20 टक्के लक्झरी किंवा मनोरंजनासाठी वापरा. हे तुम्हाला बजेट नियोजनात मदत करेल. तसेच तुम्ही कोणत्याही वस्तूची खरेदी करताना 20 टक्के डाऊन पेमेंट आणि त्या वस्तूचा कर्जाचा कालावधी 4 वर्षांचा करून घ्यावा . त्याचबरोबर EMI च्या रकमेमुळे बजेटवर जास्त प्रभाव पडू नये याची खास काळजी घ्यावी . आपल्या कुटुंबातील लोकांच्या सुरक्षेसाठी 10 पट आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा घेणे आवश्यक आहे. हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
स्मार्ट आर्थिक नियोजन
तुम्ही कर्ज घेत असाल तर कर्जाचा डोंगर वाढवू नका . कर्जाची एकूण रक्कम 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवा. गृहकर्जाचा कालावधी कमी ठेवून व्याज कमी करणे फायद्याचे ठरते. इक्विटी आणि म्यूच्यूअल फंडामध्ये 20 ते 30 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करू नका. गुंतवणूक विविध ठिकाणी करण्याचा सल्ला तज्ञ देतात, ज्यामुळे जोखमीचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारच्या स्मार्ट आर्थिक नियोजनामुळे तुमचा पगार योग्यरीत्या वापरता येईल आणि भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी तुम्ही योग्य पाऊले उचलू शकाल.