Government Schemes for Investment : गुंतवणुकीसाठी सरकारच्या ‘या’ 10 योजना एकदम सुरक्षित; देतात उत्तम परतावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Schemes for Investment) गेल्या काही काळात गुंतवणुकीकडे वाढता कल पहायला मिळाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची संख्या आज मोठी आहे. यासाठी अनेक बँका, संस्था गुंतवणुकीच्या विविध योजना राबवत असतात. गुंतवणूकदार मात्र सरकारच्या योजनांना विशेष पसंती देताना दिसतात. कारण या योजना नेहमीच खात्रीशीर आणि विश्वासार्ह ठरल्या आहेत.

जर तुम्हीही अशाच सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा काही योजनांची माहिती देणार आहोत. ज्या केवळ सुरक्षा नव्हे तर चांगला परतावादेखील देतात.

1. राष्ट्रीय बचत योजना (Government Schemes for Investment)

सरकारची ही योजना अत्यंत सुरक्षित आणि चांगला परतावा देते. या योजनेच्या खात्यात किमान १००० रुपये ठेवता येतात. तर सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख आणि जॉईंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये ठेवता येतात. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. या योजनेतून १ वर्षानंतर पैसे काढता येतात. मात्र, मुदत संपण्याच्या ३ वर्षे आधी पैसे काढते तर २ टक्के कपात लागू होते. जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या तिमाहीत ही योजना ७.४ टक्के इतका व्याजदर देते.

2. राष्ट्रीय बचत ठेव योजना

सरकारच्या राष्ट्रीय बचत ठेव योजनेत किमान १००० रुपये ठेवता येतात. या योजनेत १ ते ४ वर्षे मुदत ठेव उपलब्ध आहेत. तसेच या योजनेत १०० च्या पटीत अधिक ठेवी करता येतात कारण कमाल ठेवीवर मर्यादा घालण्यात आलेली नाही. (Government Schemes for Investment) या योजनेअंतर्गत ५ वर्षांच्या ठेवींवर आयकर कायदा १९६१ नुसार कर सूट मिळते. या योजनेत तिमाहीसाठी १ वर्षांच्या ठेवीवर ६.९%, २ वर्षांच्या ठेवीवर ७%, ३ वर्षांच्या ठेवीवर ७.१०% तर ५ वर्षांच्या ठेवीवर ७.५ टक्के इतका व्याजदर दिला जातो.

3. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

सरकारच्या या योजनेत किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येते. पुढे १०० च्या पटीत जास्त गुंतवणूक करता येते. या योजनेचा कालावधी ५ वर्षाचा आहे. यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेता येते. या योजनेअंतर्गत जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या तिमाहीत ७.७% व्याजदर दिला जात आहे.

4. पोस्ट ऑफिस बचत खाते

सरकारच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान ५०० रुपये गुंतवता येतात. (Government Schemes for Investment) तर कमाल ठेवीवर मर्यादा नाही. या योजनेचा व्याजदर ४% इतका आहे. बचत खात्यावरील व्याजदर इतर योजनांच्या तुलनेत कमी आहे

5. ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ही योजना ओळखली जाते. यात किमान १००० रुपये जमा करावे लागतात. तर जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा करता येतात. या योजनेंतर्गत खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे वय ६० वर्षे किंवा त्याहून जास्त असावे. तसेच VRS योजनेंतर्गत सेवानिवृत्ती घेणारी व्यक्तीही त्यात जमा करू शकते. (Government Schemes for Investment) यावेळी खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे वय मात्र ५५ वर्षे किंवा त्याहून अधिक मात्र ६० वर्षांपेक्षा कमी असावे. या योजनेत, आयकर कायदा कलम 80C अंतर्गत करातून सूट देण्यात आली आहे. तसेच तिमाहीत व्याजदर ८.२० टक्के आहे.

6. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

सरकारची ही योजना केवळ महिलांसाठी असून यामध्ये मुलगी किंवा महिलेच्या नावावर २ लाख रुपयांपर्यंतची ठेव करता येते. योजनेचा कालावधी २ वर्षांचा असून यावरील व्याजदर ७.५% इतका आहे.

7. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सरकारी बचत योजनांपैकी ही योजना गुंतवणूकदारांची पहिली पसंती म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या खात्यात किमान ५०० रुपयांची ठेव करता येते. तर एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. (Government Schemes for Investment) आयकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत या योजनेत करातून सूट देण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी १५ वर्षांचा आहे आणि त्याचा व्याजदर ७.१% आहे.

8. सुकन्या समृद्धी योजना

या योजनेंतर्गत पालक त्यांच्या एक किंवा दोन मुलींसाठीच योजनेचा लाभ घेऊ शकतात. यात एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करावे लागतात. तर एका आर्थिक वर्षात कमाल ठेव १.५ लाख रुपये असू शकते. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत या योजनेत करातून सूट देण्यात आली आहे. १० वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी हे खाते उघडता येते आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ही योजना मॅच्युअर होते. तिमाहीत ही योजना ८.२०% व्याजदर देते.

9. किसान विकास पत्र

सरकारच्या या योजनेत किमान १००० रुपयांची गुंतवणूक करून पुढे १०० रुपयांच्या पटीत अधिक गुंतवणूक करता येते. यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नाही. (Government Schemes for Investment) तसेच या योजनेत हे प्रमाणपत्र एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. शिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देखील हस्तांतरित करता येते. या योजनेचा कालावधी ११५ महिन्यांचा आहे. तर व्याजदर ७.५% इतका आहे.

10. आवर्ती ठेव खाते

आवर्ती ठेव खात्यात किमान १०० रुपये जमा करावे लागतात. यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नाही. योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असून एकदा खाते उघडल्यानंतर १ वर्षानंतर ५०% शिल्लक काढता येते. तसेच ही योजना सुरू झाल्यानंतर ३ वर्षांनी बंद करता येते. या योजनेत ५ वर्षांच्या RD वर वार्षिक ६.७% व्याजदर मिळतो. (Government Schemes for Investment)