पुण्यात वाहन चालकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढंच नाही तर त्यामुळे ट्रॅफिक आणि गर्दी देखील रस्त्यांवर वाढलेली दिसत आहे शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विना हेल्मेट दुचाकी स्वार व सहप्रवासी यांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे एक महत्वपूर्ण निर्णय वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे. आता केवळ दुचाकी चालवणाऱ्या चालकालाच नाही तर त्याच्याबरोबर असलेल्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकी स्वार व सहप्रवासी असलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
विधानसभा निवडणुका नंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला असून दुचाकी स्वरांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येत होती मात्र आता सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई चलन मशीन मध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे.
महासंचालकांनी याबाबत काढलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, सध्या विना हेल्मेट वाहन चालकांवर सीसीटीव्ही मार्फत देखील कारवाई केली जात आहे पुणे शहरात दररोज अशाप्रकारे सुमारे 4000 चालकांवर कारवाई केली जाते मात्र त्यातून दंड देणाऱ्यांची संख्या कमी आहे.
सुमारे 10,000 वाहन चालकांवर कारवाई
एकट्या पुण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हेल्मेट विना दुचाकी चालवल्याप्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुण्यातल्या सुमारे दहा हजार वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यातून 44 लाख 57 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई आरटीओच्या वायू वेग पथकाने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कार्यालयात दुचाकीवर येणाऱ्या वाहचालकांना हेल्मेट अनिवार्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आरटीओच्या वायू वेग पथकाला ऑक्टोबर मध्ये 4165 वाहनांची तपासणी केली. त्यापैकी 2175 दुचालकांनी हेल्मेट घातले नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून सुमारे दहा लाख 29 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट नसेल तर 500 रुपयांचा दंड आहे. विभागीय आयुक्त यांनी आदेश दिल्यानंतर आरटीओ प्रशासनाने हेल्मेट न घालता दुचाकीवरून सरकारी कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. यासाठी चार पथक देखील तयार करण्यात आली आहेत