कार किंवा बाईकचे ट्रॅफिक चलान आले आहे आणि दंडाची रक्कम मोठी वाटतेय? काळजी करू नका! ‘लोकअदालत’च्या माध्यमातून तुम्ही हे चलान कमी करू शकता किंवा पूर्णपणे माफ करून घेऊ शकता. योग्य वेळ आणि माहिती असेल, तर तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.
लोकअदालतीत चालान माफ करण्याची संधी कशी मिळते?
वाहतूक नियम उल्लंघन केल्यास पोलिसांकडून ट्रॅफिक चलान जारी केले जाते. बरेच वेळा ही रक्कम मोठी असते. परंतु, लोकअदालत या विशेष न्यायप्रक्रियेअंतर्गत अशा प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा निघतो. यात: चलानाची रक्कम कमी केली जाऊ शकते. काही वेळा पूर्णपणे माफ होऊ शकते. वकीलाची गरज लागत नाही. न्यायालयात वेगळं प्रकरणही चालवावं लागत नाही
लोक अदालत’ म्हणजे काय?
लोकअदालत म्हणजे सामान्य नागरिकांसाठी वेगळं, सुलभ व जलद न्यायालयीन व्यासपीठ. इथे प्रकरणं परस्पर समजुतीने निकाली काढली जातात.
वाहतूक प्रकरणांमध्ये
- हेल्मेट न घालणे
- सिग्नल तोडणे
- चुकीची पार्किंग
- सीट बेल्ट न वापरणे अशा प्रकरणांची सुनावणी होते.
महत्त्वाची अट
तुमचे वाहन गंभीर गुन्हेगारी प्रकरणात किंवा अपघातात सहभागी नसावे. अन्यथा हे प्रकरण लोकअदालतीत घेतले जात नाही.
ई-चलान वेळेत न भरल्यास काय होऊ शकते?
जर तुम्ही ३ महिन्यांमध्ये चलान भरले नाही, तर:
- ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकतो
- वाहन जप्त केले जाऊ शकते
- काळ्या यादीत नोंद होऊ शकते
- तुरुंगवासाचाही धोका असतो
कोर्ट फीही मिळते परत
जर तुमचे न्यायालयीन प्रकरण लोकअदालतीत निकाली निघाले, तर तुम्हाला भरलेली कोर्ट फी परत मिळते. मात्र, एक लक्षात ठेवा लोकअदालतीचा निर्णय अंतिम असतो, त्याविरुद्ध देशातील कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही. पुढच्या वेळेस तुमचे ट्रॅफिक चलान आले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता, लोकअदालतीच्या तारखा तपासा, आपली बाजू मांडून दंड कमी वा माफ करून घ्या… आणि हजारो रुपये वाचवा!