संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बदलापूर अत्याचार घटनेबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. या घटनेबद्दल तीव्र चीड, तीव्र असंतोष निर्माण झाल्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळल्यानंतर सरकारने आता हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाच्या चौकशी करिता समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा रिपोर्ट आता आला असून यामध्ये काही धक्कादायक बाबी नोंदवण्यात आले आहेत.
‘त्या’ दोघी असत्या तर
याबाबत माहिती देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की,” शिक्षण विभाग समितीला तपासात असं आढळून आलं की कामिनी कायकर आणि आणि निर्मला बुरे या दोन महिला कर्मचारी शाळेमध्ये कार्यरत आहेत. या दोन्ही सेविकांवर मुलांना शौचास नेण्याची जबाबदारी होती. त्या दोघी चौकशीसाठी आल्या नाहीत. त्यांना काही सांगायचं नाही असं गृहीत धरून पुढील कारवाईसाठी प्रकरण पाठवले आहे. त्या दोघी असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे दोघींना सह आरोपी करण्यास सांगितलं आहे. ” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
या प्रकरणाबाबत पुढे बोलताना केसरकर यांनी सांगितले की, “आम्ही सध्या फक्त वस्तुस्थिती तपासत आहोत. पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. पीडित मुलीला दहा लाखांची मदत केली जाईल. ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला तिला तीन लाखांची मदत मिळणार आहे. दोन्ही मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी आम्ही घेऊ त्यासाठी लागणारे आर्थिक मदत दर महिन्याला धनादेशाच्या माध्यमातून देऊ. मुलीची ओळख उघड होणार नाही याची काळजी घेऊन दोन्ही मुलींना आम्ही मदत करू” अशी घोषणा देखील केसरकर यांनी केली.
शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब
बदलापूर प्रकरणांमध्ये मागील पंधरा दिवसांचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे. शिक्षण विभागाच्या समितीने केलेल्या चौकशीत हे समोर आलं असून शाळेच्या पदाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती होती. पण त्यांनी काहीही कारवाई केली नाही. प्रत्यक्षात सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. संबंधित शाळेचे पंधरा दिवसांचे फुटेज रेकॉर्डिंग गायब आहे. त्याची आता चौकशी करत आहोत. मुलींच्या कुटुंबीयांची लवकरच आम्ही भेट घेणार आहोत अशीही माहिती केसरकर यांनी दिली.