India breaks Indus Water : पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात सर्व पातळ्यांवर दबाव वाढवण्याची रणनीती अवलंबली आहे. लष्करी कारवाया सुरू असतानाच भारताने आता कूटनीतिक पातळीवरही पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने भारताने सिंधू जलसंधी (Indus Water Treaty) मोडण्याचा निर्णय घेतला असून पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या आश्रयस्थानी उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
बगलिहार डॅमचे फाटक बंद, चिनाबचे पाणी वळवले
भारताने सिंधू जलसंधी मोडत चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे फाटक बंद करून पाणी दुसऱ्या दिशेने वळवले आहे. चेनाब नदी ही पाकिस्तानसाठी महत्त्वाची सिंचनाची नदी असून, यामुळे पाकिस्तानमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही नदी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
भारताची वर्ल्ड बँकेला विनंती
भारताने आता सिंधू जलसंधीवर आणखी एक मोठे पाऊल उचलत किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पांसंदर्भातील जागतिक बँकेतील चालू असलेली सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली आहे. ET च्या अहवालानुसार, भारत लवकरच यासंदर्भात अधिकृत पत्र तटस्थ तज्ञांना पाठवणार आहे आणि त्याची प्रत वर्ल्ड बँकेलाही दिली जाईल. भारताने स्पष्ट केले आहे की, त्याने आता स्वतःला सिंधू जलसंधीपासून पूर्णतः वेगळे केले आहे, त्यामुळे या प्रकरणात तटस्थ तज्ञांच्या सुनावणीला आता काही अर्थ राहिलेला नाही.
काय आहे किशनगंगा-रतले वाद?
ही वादग्रस्त प्रकरणे किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित आहेत. पाकिस्तानने हे प्रकल्प जागतिक बँकेत आव्हान दिले होते. 2023 मध्ये तज्ञ मिशेल लिनो यांच्या देखरेखीखाली या वादावर प्रक्रिया सुरू झाली होती. भारत, पाकिस्तान आणि तज्ञ यांच्यात एक निश्चित कार्यपद्धतीनुसार काम सुरू होते. मात्र आता भारताने ही प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली आहे.
यावर्षी डिसेंबरमध्ये तज्ञांनी प्रकल्पस्थळी भेट देण्याचे नियोजन होते. ही प्रक्रिया 2026 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र भारताने आता या संपूर्ण प्रक्रियेवर विराम देण्याची भूमिका घेतली आहे.
भारत-पाक जलतणावात तीव्रता
या पावसाळ्यात चेनाब नदीतील पाणी थांबवल्याने पाकिस्तानमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नद्या, कालवे कोरडे पडण्याची चिन्हे दिसत आहेत. जलसंधीच्या या निर्णयामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.




