India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तणावानंतर अखेर आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती अधिकृतपणे दिली असून, परराष्ट्र सचिव विक्रम मीसी यांनी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. ही शांति भारताच्या अटींवर आधारित असून, दहशतवादाविरोधातील कठोर धोरण कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत पाकिस्तानने नियंत्रण रेषा (LOC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ विविध भागांमध्ये स्वार्म ड्रोन म्हणजेच झुंडीने ड्रोन्स पाठवले होते. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटसारख्या संवेदनशील भागांमध्ये भारतीय एअर डिफेन्स युनिट्सने अतिशय प्रभावी प्रत्युत्तर दिले आणि 50 पेक्षा अधिक ड्रोन्स हवेतच निष्प्रभ केले. भारतीय लष्कराच्या या झपाट्याने दिलेल्या प्रतिसादामुळे पाकिस्तानला मोठा धक्का (India Pakistan Ceasefire) बसला आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून वारंवार चुकीची माहिती प्रसारित केली जात होती. विशेषतः भारताने धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याचा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र, भारताच्या तीनही सैन्यदलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले असून, भारताकडून कोणत्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक सामंजस्य करार झाला असून, हवाई दल, नौदल आणि भूदल या तिन्ही दलांकडून लष्करी कारवाया थांबवण्यात आलेल्या आहेत. हा युद्धविराम भारताच्या अटींवर मंजूर झालेला असून, देशाच्या सुरक्षेवर कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले (India Pakistan Ceasefire) आहे. त्यांनी सांगितले की, दहशतवादाविरोधात भारत आता कुठल्याही स्वरूपाची माघार घेणार नाही.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीस गेले असून, त्यांनी युद्धविरामाची संपूर्ण माहिती पंतप्रधानांना दिली आहे. या भेटीत पुढील धोरणात्मक निर्णयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
या युद्धविरामाच्या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ (Director Generals of Military Operations) 12 तारखेला औपचारिक चर्चा करणार आहेत. आज दुपारी 3:35 वाजता पाकिस्तानी डीजीएमओंनी भारतीय डीजीएमओंना फोन केल्याची माहितीही समोर आली आहे, ज्यातून शांततेचा हा पुढील टप्पा ठरू शकतो.




