India Pakistan Tension : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केल्यानंतर आता पाकिस्ताननेही भारताविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. या प्रतिहल्ल्याला पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान उल मरसूस’ असं नाव दिलं असून हे नाव कुरआनमधील एका आयतीवरून घेतलं आहे, ज्याचा अर्थ “भक्कम भिंत” असा होतो.
पहाटेपासून भारतातील १२+ शहरांवर हल्ला
संकेत मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने या ऑपरेशनअंतर्गत (India Pakistan Tension) शनिवार (१० मे) पहाटेपासून नवी दिल्ली, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जालंधर अशा १२ पेक्षा अधिक भारतीय शहरांवर क्षेपणास्त्र, ड्रोन आणि मोर्टारद्वारे हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या जखमी होण्याचे वृत्त असून, पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका घरात लागलेल्या आगीत तीन जण जखमी झालेत. जम्मूमधील आरएसपुरा भागातही एका नागरिकाला इजा झाली आहे.
POK आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर रात्रीभर ड्रोन हल्ले
याआधी शुक्रवारी रात्री पाकिस्तानने POK आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सीजफायरचे उल्लंघन करत भारताच्या सुमारे ३० भागांवर ड्रोनद्वारे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पंजाब, राजस्थान आणि हरियाणामधील नागरी भाग टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय लष्कराने बहुतेक सर्व ड्रोन हल्ल्यांना हवेतच निष्प्रभ केलं.
भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा
पाकिस्तानने भारतावर ६ बॅलिस्टिक मिसाईल दागल्याचा आरोप केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या हल्ल्यांमध्ये रावलपिंडी येथील नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफीकी एअरबेस आणि मुरीद एअरबेसवर निशाणा साधण्यात आला. सध्या पाकिस्तानने आपला हवाई क्षेत्र (एअरस्पेस)देखील तात्पुरता बंद केला असून सकाळी ३.१५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी लागू करण्यात आली आहे.
बुनयान उल मरसूस
‘बुनयान उल मरसूस’ या ऑपरेशनचं नाव कुरआनच्या आयतीवरून घेण्यात आलं आहे. याचा अर्थ “एकजूट, शक्ती आणि शिस्तीने सज्ज झालेली भिंत” असा होतो. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, हे ऑपरेशन भारतीय आक्रमकतेविरुद्ध सुरू करण्यात आलं असून, यामध्ये त्यांनी पठाणकोट, उधमपूर आणि श्रीनगरमधील भारतीय बेस टार्गेट केल्याचा दावा केला आहे. मात्र, भारताकडून अद्याप याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
महत्त्वाचे मुद्दे
- पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान उल मरसूस सुरू केलं
- १२ हून अधिक भारतीय शहरांवर ड्रोन व मिसाईल हल्ले
- भारतीय नागरिक जखमी, काही घरांना नुकसान
- पाकिस्तानने आपला हवाई क्षेत्र तात्पुरता बंद केला
- भारताने अद्याप पाकिस्तानच्या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही




