International Women’s Day 2024 : स्त्री’त्वाला पूर्णत्वाची गरज…

International Women's Day 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (International Women’s Day 2024) मार्च महिना सुरु झाला की, प्रत्येकाला प्रामुख्याने होळी आणि धुळवडीचे वेध लागतात. पण या खास महिन्यात आणखी एक जागतिक सण येतो. तो म्हणजे ‘जागतिक महिला दिन’. आता तुम्ही याला सण म्हणा, उत्सव म्हणा किंवा आणखी काही. पण हा दिवस महिलांसाठी अत्यंत खास असतो. दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात ‘जागतिक महिला दिन’ वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

मुळात महिला आणि सण यांचा किती घनिष्ट संबंध असतो ते काही वेगळं सांगायला नको. अशातच जेव्हा स्वतःच्याच आनंदाचा विषय असेल तेव्हा महिला मागे कशा राहतील बरं? (International Women’s Day 2024) त्यामुळे हा खास दिवस साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी महिला सप्ताह, महिला पंधरवडा, व्याख्यानं, परिसंवाद, मेळावे, सत्कार, महिलाकेंद्री चित्रपटांचे महोत्सव, वस्त्रालंकारांच्या खरेदीवर सवलती, खास सहली-सफरी आणि अजून बरंच काही नियोजित केलेलं असतं. असं पाहिलं तर हा दिवस तमाम स्त्री वर्गासाठी आनंदाचा असतो. पण खरंच आपल्या आजूबाजूला असणारी ‘ती’ आनंदी आहे????

महिलांच्या आनंदाची व्याख्या (International Women’s Day 2024)

अनेकांना वाटतं आपल्या संपर्कातील स्त्री ही कायम आनंदी असते. तसं गृहीत धरलं जातं आणि त्यामुळे महिलांना कधी त्यांचा आनंद नेमका कशात आहे? हे विचारलं जात नाही. कुणाला वाटत तिला पैसे द्या ती खुश होईल. कुणाला वाटत तिला साडी दिली तर ती खुश होईल. पण मुळात एका स्त्रीच्या आनंदाची व्याख्या नेमकी काय आहे? हे कुणालाच ठाऊक नसतं. खरंतर कुणाच्याच आनंदाची ठरलेली अशी व्याख्या नसते. पण काही गोष्टी आपल्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी पुरेशा असतात.

स्त्रियांबद्दल म्हणायचं झालं तर, तिच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पोटभर जेवून झोपली तरी ती आनंदी होते. (International Women’s Day 2024) तिला महागड्या वस्तूंची गरज नसते. तिला प्रेमाने आणलेलं गुलाब सुद्धा आनंदी व्हायला पुरेसं असतं. तिच्या समर्पणाची, तिच्या स्वाभिमानाची आणि तिच्या अस्तित्वाची जर तुम्ही जाण ठेवलीत तर म्हणू शकाल की, तुमच्या आयुष्यातील ‘ती’ आनंदी आहे.

हत्ती गेला शेपूट राहिलं

पूर्वीच्या काळी बालविवाह, सतीची चाल, सातच्या आत घरात अशा अनेक परंपरा चालायच्या. बाईने असं असावं, बाईने तसं दिसावं, बाईने असं उठावं, बाईने तसं बसावं आणि अजून बरंच काही. परंपरा कमी आणि जाच जास्तच. ज्या अलंकाराने स्त्रीचे सौंदर्य खुलते त्या अलंकारांचेसुद्धा ओझे वाटेल अशा पद्धती होत्या. (International Women’s Day 2024) पायात पैंजण म्हणजे बागडायचं नाही. नाकातली नथ ओठांवर येऊन सांगायची की, बोलायचं नाही. हातातल्या बांगड्यांचा आवाज होता कामा नये. कपाळावर टिकली टिकायलाच हवी. आजकाल अशा आणि इतक्या कठोर रुढी उरल्या नाहीत. मात्र अजुनही अनेक घरांमध्ये स्त्रियांना उठायला, बसायला, हसायला, हिंडायला मर्यादा आहेत. आयुष्यात मर्यादा हवीच पण त्या मर्यादांमुळे घुसमट होता कामा नये इतकंच.

घे भरारी

पूर्वापार काळात स्त्रियांवर अनेक बंधनं लादण्यात आली होती. मात्र आज अनेक बंधनांचे पाश तोडून स्त्री भरारी घेऊ पाहतेय. आज असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये स्त्रिया कार्यरत नाहीत. (International Women’s Day 2024) अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आजची स्त्री स्वछंद भरारी घेते आहे. पूर्वीच्या पुरुषप्रधान समाजाला आज नारीशक्तीची जाणीव होते आहे. याहून जास्त काय हवं? आजच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक उद्योजिका घडत आहेत. गृहिणीसुद्धा केवळ चूल आणि मूल यासाठी मर्यादित राहिलेल्या नाही. त्यामुळे आजची स्त्री खऱ्या अर्थाने आधुनिक जीवन जगतेय असे म्हणायला हरकत नाही.

‘जागतिक महिला दिन’

मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर एक स्त्री वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. चंदनासमान आयुष्यभर इतरांसाठी झिजत असते. तिच्या अस्तित्वाचा दरवळ फार सुगंधी असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात ‘ती’ची एक वेगळी जागा असते. तरीही ‘जागतिक महिला दिना’कडे अनेक लोक नकारात्मक पद्धतीने पाहतात. बायकांच्या कर्तबगारीने आणि यशाने भयभीत झालेल्या पुरुषांचा यात समावेश असतो.

(International Women’s Day 2024) जगभरातील सगळेच पुरुष या चौकटीत येत नसले तरी जे येतात त्यांना कायम एक सल खलत असते. ती अशी की, महिलांना सगळीकडे झुकतं माप मिळतं. कायदेसुद्धा एकतर्फी आणि त्यांच्या बाजूचे, या बायकांना डोक्यावर चढवून ठेवलंय. असे समज बाळगणारे लोक आपल्या हातात काहीच नाही हे समजताच बायकांचं चारित्र्यहनन करणे, शारीरिक बळजबरी करणे, स्त्रियांवर विक्षिप्त आरोप करून त्यांना कलंकित करण्याचे काम करतात. त्यांच्या बुद्धीची करावी तेव्हढी कीव कमीच!!

अशा बुद्धिहीन समाजात काही स्त्रियांचादेखील समावेश आहे, ही एक दुःखद बाब आहे. त्यांच्या निर्लज्ज वागणुकीमुळे आजही अनेक स्त्रिया शोषित आयुष्य जगत आहेत. तर काही स्त्रिया अशा मूर्ख लोकांना तर्कशुद्ध उत्तरं देण्यासाठी लढा देत आहेत. कित्येक बायका हातपाय गाळून देतात आणि बळी जातात. ही स्त्री- पुरुषांमध्ये सुरु असलेली लढाई थांबायचे नाव घेत नाही, हे भीषण वास्तव आहे.

स्त्रीत्व अपूर्णच…

या कारणांमुळे आजही स्त्रीत्व अपूर्णच आहे. वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक पायऱ्यांवर स्त्री तिला कायम सिद्ध करत आली आहे. मात्र, पदोपदी होणारी अवहेलना आणि द्यावी लागणारी परीक्षा तिच्या स्त्रीपणाला कायम ठेच देत आली आहे. असे असूनही स्त्रीत्वामध्ये सहानुभूती, समर्पण, संवेदनशीलता, सहकार्य, संयम आणि तडजोड यासारखे मुख्य गुण समाविष्ट आहेत. जे प्रकृतीच्या गुणधर्मांशी साम्य राखतात.

म्हणून, एकमेकांचे स्पर्धक बनण्यापेक्षा एकमेकांसाठी पूरक होऊ आणि समाजात चांगलं काम करू ही भावना रुजवण्याची गरज आहे. (International Women’s Day 2024)’बाईच बाईची शत्रू’ अशा भोंगळ विधानांना हाणून पाडून ‘बाईच बाईची खरी मैत्रीण’ असे सकारात्मक चित्र तयार व्हायला हवे. या आणि पुढील प्रत्येक महिला दिनाचे एकच उद्दिष्ट असायला हवे, ‘ती’लासुद्धा खऱ्या अर्थाने दर्जेदार आयुष्य आणि स्वातंत्र्य मिळायला हवे.

प्रवास तुझा संपणार नाही,
तू आपली चालत रहा..
काट्याकुट्याच्या रानातही,
मधुराणी होऊन फुलत रहा..

जगभरातील तमाम महिला वर्गाला हॅलो महाराष्ट्रचा कडकडीत सलाम!! आणि जागतिक महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा!!