IPS अधिकारी समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात ? कोणत्या पक्षाकडून लढणार ?

sameer vankhede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून विधानसभेची चर्चा सुरु असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच वरिष्ठ आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते महायुतीकडून निवडणूक लढणार असून, आता राजकारणात दबंग अधिकाऱ्याची एन्ट्री होणार आहे. अजून त्यांनी अधिकारी पदाचा राजीमान दिला नसून , लवकरच ते पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करतील.

शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत, मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडूनही त्यांना पाठिंबा मिळेल अशी चर्चा सुरु आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, जो केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून मंजूर झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करतील . राजीनाम्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू होईल.

अंमली पदार्थ विरोधात छापेमारी

हे 2008 च्या बॅचचे आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी आहेत. ते 2021 पर्यंत अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागाचे माजी संचालक होते. त्यांच्या 15 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी अमली पदार्थ विरोधात मोठ्या प्रमाणात छापेमारी करून 17000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त केले आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, ज्यात बॉलिवूडशी संबंधित अनेक व्यक्तींवर छापे टाकण्यात आले होते.

धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख

समीर वानखेडे यांनी त्यांच्या सेवाकाळात अनेक महत्वाच्या कारवायांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली तेव्हा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात पकडले होते. या प्रकरणानंतर ते चर्चेत आले होते. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज नेटवर्क उघड करण्यामागेही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच त्यांनी गायक मिका सिंहला परदेशी चलनासह पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, आणि राम गोपाल वर्मा यांच्या घरीही छापे टाकले होते. त्यामुळे त्यांना एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाते. समीर वानखेडे यांच्या राजकीय प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरणार आहे.