‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार; फर्स्ट लूक आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरून ‘देवमाणूस’ ही मालिका तुफान गाजली. या मालिकेचे शीर्षक जितके वेगळे होते तितकीच ही मालिका अनोखी ठरली. सत्य कथेवर आधारलेल्या या जबरदस्त मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड मध्यवर्ती भूमिकेत झळकला. त्याने साकारलेला नकारात्मक भूमिकेतील डॉक्टर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. यानंतर किरण गायकवाडने काही सिनेमांमध्ये देखील काम केले. ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘चौक’, ‘फकाट’ यांसारख्या मराठी चित्रपटांनंतर आता लवकरच तो पुन्हा एकदा मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे.

कोणत्या चित्रपटात झळकणार?

अभिनेता किरण गायकवाडच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘नाद – द हार्ड लव्ह’ असे आहे. अलीकडेच या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करण्यात आली. ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून हा चित्रपट प्रेम या विषयावर आधारलेला असेल, असे समजून येत आहे. या चित्रपटाची निर्मिती शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांनी एकत्र मिळून केली आहे, तर ‘रांजण’, ‘बलोच’ अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

पहिल्यांदाच साकारणार नायकाची भूमिका

अभिनेता किरण गायकवाड ‘देवमाणूस’ या मालिकेनंतर चांगलाच प्रसिद्धी झोतात आला. या मालिकेत त्याने साकारलेला नायक खलनायक जरी असला तरी त्याची विशेष छाप प्रेक्षकांवर पडली. या मालिकेत पहिल्यांदाच प्रेक्षकांनी किरणला नायकाच्या भूमिकेतून पाहिले होते. यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले.

मात्र, त्याच्या पदरी सहाय्यक भूमिका आल्या. यानंतर आता पहिल्यांदाच तो चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटात त्याची साथ द्यायला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिंबळे हे कलाकार असणार आहेत.

वेगळ्या लूकमुळे चर्चा

सोशल मीडियावर किरण गायकवाडने काही दिवसांपूर्वी त्याचा एक नवा आणि हटके असा लूक शेअर केला होता. जो पाहून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अगदी उधाण आलं आहे. या चित्रपटात किरण नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो सज्ज आहे.

महत्त्वाच्या घटनांवर प्रकाशझोत टाकणार

या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणाले की, ‘प्रेमकथेचा आधार घेत समाजात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारं कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे’. या चित्रपटाची कथा संतोष दाभोळकर आणि दीपक पवार यांनी लिहिली असून डॉ. विनायक पवार यांची पटकथा आणि संवादलेखन आहे. तर संगीतकार पंकज पडघन यांनी संगीताची धुरा सांभाळली आहे.