कोल्हापूरकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापुरातून थेट गुजरात गाठता येणार आहे. कोल्हापूर ते अहमदाबाद विमानसेवा येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. याबाबतची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरहून गुजरातला जाणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
व्यापाऱ्यांना होणार फायदा
ही सुविधा आठवड्यातील चार दिवस म्हणजेच सोमवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी असणार आहे. याबाबत माहिती देताना महाडिक म्हणाले की, कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी जात असतात. त्यामुळे कोल्हापूर वरून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती.
50 आसनक्षमतेचे विमान घेणार उड्डाण
कोल्हापुरातून तिरुपती विमान सेवा सुरू झाल्यानंतर नागपूर आणि गोवा तसेच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूरकरांची आणखी एक मागणी पूर्ण होणार असून कोल्हापुरातून अहमदाबाद या मार्गावर स्टार एअरलाईन कंपनीचे 50 आसनक्षमतेचे विमान उड्डाण करणार आहे. या सेवेमुळे गुजरात सह राजस्थान आणि उत्तर भारताशी कोल्हापूर हवाई सेवेन जोडले जाणार आहे अशी माहिती महाडिक यांनी दिली.
दरम्यान सध्या कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर -बंगळूर, कोल्हापूर- हैदराबाद, कोल्हापूर- मुंबई, कोल्हापूर- तिरुपती या मार्गावर विमान सेवा सुरू केल्या आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. त्यानंतर आता कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा अंतिम होण्याच्या टप्प्यात आहे लवकरच ही विमान सेवा सुद्धा सुरू होईल
काय असेल वेळापत्रक
कोल्हापूरहून सकाळी 11 वाजता विमान अहमदाबाद साठी उड्डाण करणार आहे. तर बारा वाजून वीस मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचणार आहे. तसंच अहमदाबाद वरून बारा वाजून 45 मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि दोन वाजून पाच मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल, त्यासाठी तिकिटाचे बुकिंग सुरू असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे