मित्रपक्षांचा गेम करत भाजपने बळकावल्या परभणीतील २ जागा; ४ मतदारसंघात ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

नामनिर्देशन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघाचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले आहे. ४ मतदारसंघात एकूण ५३ उमेदवार शिल्लक राहिले असून यांच्यातच अंतिम लढाई होणार आहे. महायुतीतील मित्रपक्षांना जिल्ह्यात देण्यात आलेल्या दोन जागा भाजपने आज शेवटच्या क्षणी आपल्याकडे घेतल्या आणि मित्रपक्षांना ठेंगा दिला आहे. जिंतूर व पाथरी विधानसभा मतदारसंघ भाजपाने कपटनिती वापरत खेचून नेला आहे असा आरोप मित्रपक्षांनी केला.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने आपली उमेदवारी असल्याचं जाहीर केलं आहे. महायुतीत धोका झाल्याचे म्हणत रासपने रत्नाकर गुट्टे यांना अधिकृत उमेदवार घोषित केलं. याठिकाणी आता महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि रासप एकमेकांविरोधात लढणार आहेत. सीताराम घनदाट, संतोष मुरकुटे आणि राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या तीन बंडखोर उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले आहेत. डॉक्टर जगदीश शिंदे यांनी मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पसंती दिली आहे. शिवसेनेतून ते इच्छुक होते.

पाथरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे मोहन फड व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्यात लढत होणार आहे .परभणी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे सुरेश नागरे हे अपक्ष म्हणून लढणार आहेत. याठिकाणी काँग्रेसकडून रविराज देशमुख तर शिवसेनेकडून डॉ. राहूल पाटील उमेदवार आहेत. जिंतूरमधून भाजपच्या चिन्हावर मेघना बोर्डीकर लढणार आहेत. यापूर्वी त्यांना महायुतीतील रासपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली होती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार विजय भांबळे पुन्हा लढणार आहेत. चारही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार दिले असून ते कुणाचं नुकसान करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत. यामध्‍ये ९५-जिंतूर- एकुण १७ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी, ९६-परभणी – मतदारसंघातील एकुण २७ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी, ९७-गंगाखेड- मतदारसंघातील एकुण २३ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी, ९८- पाथरी- मतदारसंघातील एकुण १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. चिन्ह वाटपानंतर तब्बल बारा दिवस प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

Leave a Comment