मुंबई म्हाडाची लॉटरी यापूर्वीच जाहीर झाली असून आता पुणे मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. चला जाणून घेऊया या लॉटरीबाबत…
कधीपासून भरता येणार अर्ज
जर तुम्हाला या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वा. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याहस्ते आज ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. पुणे मंडळातर्फे सदनिका (Home) विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 5 डिसेंबर, 2024 रोजी काढण्यात येणार आहे. दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात होणार असून नोंदणीकृत अर्जदार दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 रोजी 12 वाजेपासूनच ऑनलाइन पेमेंट देखील करू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया दिनांक 12 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येणार आहे. 12 नोव्हेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 पर्यन्त अर्जदार ऑनलाइन अनामत रक्कमेच भरणा करून शकणार आहेत.
30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार अर्जाची यादी
पुणे म्हाडा सोडतीसाठी 13 नोव्हेंबर,2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिमतः 30 नोव्हेंबर रोजी सोदातीत सहभाग घेणार्या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2340 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 418 सदनिका प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3312 सदनिकांचा समावेश आहे तसेच 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 131 सदनिकांचा समावेश आहे.
मंडळातर्फे इच्छुक अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की, अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे. ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही. अशी सूचना म्हाडाकडून देण्यात आल्या आहेत.