Mahaparinirvana : एक अंतयात्रा, असंख्य समुदाय आणि हुंदक्यांनी व्यापलेली मुंबापुरी; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘महापरिनिर्वाण’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahaparinirvana) शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली आहे.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार महापरिनिर्वाण (Mahaparinirvana)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर २०२४ रोजी ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली असून या चित्रपटात अनेक दमदार कलाकारांची फळी आपल्याला पहायला मिळणार आहे.

‘हे’ कलाकार दिसणार

अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हे सध्यातरी गुपित आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे आणि अमर कांबळे डीओपी आहेत. तर लेखन चेतक घेगडमल आहेत. (Mahaparinirvana)

महामानवाला ‘महापरिनिर्वाण’मधून मानवंदना

चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ‘आम्हाला आनंद आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. हा चित्रपट म्हणजे आमच्याकडून ही एक मानवंदना आहे. (Mahaparinirvana) ‘एक कथा दोन इतिहास’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. असंख्य जनसागर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोटला होता’.

‘यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहित नाहीत, त्या विस्तृतपणे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. अवघी मुंबापुरी यावेळी थांबली होती. हा मन सुन्न करणारा प्रसंग आपण नामदेवराव व्हटकर यांच्या नजरेतून पाहाणार आहोत’. (Mahaparinirvana)