Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रात महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे. आज महायुतीकडून पत्रकार परिषद घेऊन ‘रिपोर्ट कार्ड’ सुद्धा प्रकाशित करण्यात आले. आता उत्सुकता आहे ती जागावाटपाची. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे मुख्य पक्ष एकत्रित येऊन तयार झालेल्या महायुतीमध्ये कोणाला किती जाग मिळणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 90 टक्के जागांचे वितरण निश्चित झाले असल्याची चर्चा आहे. 288 जागांपैकी भाजप 158 जागांवर, शिवसेना शिंदे गट 70 जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गट 50 जागांवर लढणार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत तिन्ही पक्षांमध्ये 278 जागांवर एकमत झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
दरम्यान, याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी २३० जागांवर महायुती आघाडीत करार झाला आहे. जागांवर अंतिम निर्णय झाल्यानंतर याबाबतची संपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांना देऊ.
याआधी भाजपने जवळपास 100 जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेल्या कोअर ग्रुपच्या बैठकीत जागांबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मंगळवारी सीईसीची बैठकही झाली, ज्यामध्ये पीएम मोदीही सहभागी झाले होते. अशा परिस्थितीत भाजप झारखंड आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करू शकते.
लोकसभेच्या आधारे जागा वाटप
महायुतीतील जागावाटप लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे करण्यात आले आहे. अशा स्थितीत भाजप 158 जागांवर, शिवसेना 70 जागांवर आणि राष्ट्रवादी 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 15 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 7 तर राष्ट्रवादीने 4 जागांवर निवडणूक लढवली मात्र केवळ एक जागा जिंकण्यात यश आले. तर भाजपने 28 जागांवर निवडणूक लढवली आणि केवळ 9 जागांवर विजय मिळवला.