महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची दखल घेऊन एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचला असून, त्याचा मोठा प्रभाव आता राज्यभर दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळावर भव्य स्मारक उभारण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड शौर्य आणि धैर्य दाखवले. संगमेश्वर येथील युद्धामुळे याठिकाणाचे महत्त्व विशेष आहे, कारण येथे आणि याच्या आसपासच्या प्रदेशात संभाजी महाराजांनी आपल्या महाकाय शत्रूंसोबत युद्ध केले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्या ऐतिहासिक पराक्रमाची स्मृती कायम ठेवण्यासाठी संगमेश्वरमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल.
याशिवाय, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे. “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील महाराजांचे बलिदानस्थळे आणि समाधीस्थळे याठिकाणी देखील स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे.
मराठी भाषेच्या सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णय
आजीत पवार यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. 3 ऑक्टोबर या दिवशी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येईल, आणि याच दिवशी 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाईल. महाराष्ट्र सरकारने या दिवसाला अधिकृतपणे सन्मान दिला आहे. यासोबतच, मराठी भाषा संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे.
अशाप्रकारे, अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची मोठी दखल घेतली आहे.