विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक ! गायीला राज्य माता-गोमातेचा दर्जा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचे स्वरूप मानलं जातं. गाईला ‘गोमाता’ असं संबोधलं जातं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले जाताना दिसत आहेत. त्यामध्ये योजना आणि प्रकल्पांचा समावेश आहे. अशातच आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत गाईला ‘राज्य माता -गोमातेचा’ दर्जा घोषित करण्यात आला आहे. शिंदे सरकारचा हा निर्णय म्हणजे मास्टर स्ट्रोक असल्याचे मानला जात आहे. यासोबतच राज्यभरातल्या हिंदू संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

जीआरही काढण्यात आला

दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील देशी गाईंना ‘राज्यमाता- गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली त्यानंतर गाईंना राजमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे. भारतीय परंपरेत गाईला अत्यंत महत्त्व आहे त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतलाय असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसंच राज्यात देशी गाई घटल्या बद्दल चिंता ही व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान राज्य सरकारने गायींना राज्य- माता दर्जा दिल्याने विश्व हिंदू परिषदे कडून सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. सरकारच्या निर्णयामुळे गाईंना आता संरक्षण प्राप्त होईल. गेली अनेक वर्ष या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती. मात्र आता मागणीला यश आलं असून विश्व हिंदू परिषदेचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून अभिनंदन करणार आहेत असे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री विंद शेंडे यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हंटल आहे.