महाराष्ट्रातल्या विकास योजनेला नवे गतीमान रूप मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीकेसीतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
132 स्टेशन वर्ल्ड क्लास बनणार
राज्यातील तब्बल 132 रेल्वे स्टेशन वर्ल्ड क्लास दर्जाचे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंबईसाठी 238 नव्या एसी गाड्या दिल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली. मुंबईसह राज्यभरातील प्रवाशांसाठी ही एक मोठी सुविधा ठरणार आहे.
गोंदिया-बलारशा मार्गाला मंजुरी, व्यापारास नवा वेग
गोंदिया ते बलारशा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण केंद्र सरकारने मंजूर केले असून यासाठी ४८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गामुळे महाराष्ट्र व छत्तीसगडमधील व्यापाराला चालना मिळणार आहे.
राज्यात रेल्वेच्या माध्यमातून 1.73 लाख कोटींचा विकास
राज्यात सध्या १ लाख ७३ हजार कोटी रुपयांची रेल्वे कामे सुरू आहेत. त्यातील १७ हजार कोटींचे प्रकल्प केवळ मुंबईसाठीच आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे विकास होत असताना महाराष्ट्र देशातील एक महत्त्वाचा ट्रान्सपोर्ट हब बनू पाहतो आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट – ऐतिहासिक ठिकाणांची 10 दिवसांची सफर
याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजून एका वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली – ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’. या योजनेअंतर्गत १० दिवसांची खास टूर आयोजित करण्यात येणार असून यात शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देता येईल.
मुंबई होणार जागतिक मनोरंजन उद्योगाचे केंद्र
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली – “मुंबईत जगातील सर्वात मोठी मनोरंजन इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे.” यामुळे मुंबई केवळ आर्थिक राजधानीच नाही, तर जागतिक मनोरंजनाचे प्रमुख केंद्रही ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.