Maharashtra Weather Update: देशाच्या विविध भागात हवामान बदलत आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, पुढील सात दिवसांत देशाच्या अनेक भागात पाऊस, गडगडाटी वादळे, विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराज्यात सुद्धा राष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांनी थैमान घातले आहे. हवामान विभागाने राज्यात १८ मेपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काहींना ऑरेंज अलर्ट जारी (Maharashtra Weather Update) करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, जिथे अधिक तीव्र हवामान स्थिती राहू शकते.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १४ ते १८ मे या काळात कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ३० ते ५० किमी प्रतितास इतका असू शकतो, तर काही भागांमध्ये तो ६० ते ७० किमी प्रतितासांपर्यंत जाऊ शकतो. गुजरात राज्यातसुद्धा १४ आणि १५ मे रोजी अशाच स्वरूपाच्या हवामान बदलाची शक्यता आहे.
काय काळजी घ्याल ?
या बदलत्या हवामानामुळे शेती, जनावरे, वाहतूक आणि विद्युत पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे, फवारणी आणि कापणी टाळावी, जनावरांना आडोशात ठेवावे आणि विजेच्या गळतीपासून सावध राहावे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे हवामान विभागाचे आवाहन आहे.




