Mahbooba Mufti : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (PDP) प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी अत्यंत भावनिक अपील करत दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. “हे युद्ध आता थांबवाच, आमच्या मातांनी वेदना किती काळ सहन करायची ?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
महबूबा मुफ्ती म्हणाल्या, भारत हा उदयोन्मुख महासत्ता आहे, तर पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांनी विनाशाच्या मार्गावर जाणं थांबवलं पाहिजे. सीमावर्ती भागातील नागरिक दररोज भीतीच्या सावटात जीवन जगत आहेत.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आतंकी तळ नष्ट करण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, आता या युद्धाचा शेवट करायला हवा. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत असतानाही त्यांनी शांततेसाठी कडक शब्दांत आपली भूमिका मांडली.
खोटा प्रचार थांबवा, चर्चेला सुरुवात करा
महबूबा मुफ्ती यांनी माध्यमांवरही टीका करत सांगितले, प्रचाराचीही एक सीमा असते. दोन्ही देशांत माध्यमांनी नकारात्मकतेचा प्रसार केला आहे. आपण अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत आणि त्याचे दुष्परिणाम सामान्य, निरपराध लोकांवरच होतील. त्यांनी असेही सांगितले की, आपल्याला ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वावर विश्वास ठेवावा लागेल. राजकारण, लष्करी कारवाया आणि सूडभावनेपेक्षा लोकांच्या जिवाची किंमत अधिक आहे.
राजकीय तोडगा शोधा, युद्ध हा पर्याय नाही
जंग हा कधीच उपाय ठरत नाही. आता संवादाचा, चर्चेचा आणि राजकीय मार्गांचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं सांगत महबूबा मुफ्तींनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट संवादाची गरज अधोरेखित केली.
ऑपरेशन ‘सिंदूर’
भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून सीमावर्ती भागात भारतीय नागरिकांचे रक्षण, आपत्कालीन हालचाली, आणि महत्त्वाच्या सैनिकी मोहिमा गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत सीमावर्ती भागात अतिरिक्त सैनिकी तैनाती, आकाशातून पाळत, तसेच सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ऑपरेशनचा उद्देश म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी कडेकोट सज्जता राखणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे.




