Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा जीवनपट रिलीजसाठी सज्ज; ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Manoj Jarange Patil) मराठा समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असल्यामुळे मराठा आरक्षण हा सध्या अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जरांगे पाटलांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पूर्ण करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. तर सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. (Manoj Jarange Patil) शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके अशा कलाकारांची मांदियाळी पहायला मिळणार आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळीच ओळख आहे. इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखले जायचे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील…’ (Manoj Jarange Patil)

(Manoj Jarange Patil)मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणि उपोषणे करून त्यांची मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. ज्यासाठी त्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यापासूनच लोकांमध्ये या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता पहायला मिळाली आहे. सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल्या या करारी नेतृत्वाचे चित्रण या चित्रपटातून केले आहे. जे लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.