Matheran : हिरवाईने नटलेले महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर ठिकाण; पावसाळ्यात देते स्वर्गसुखाची अनुभूती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matheran) महाराष्ट्रात नुकताच मान्सून दाखल झाला आहे. ठिकठिकाणी पावसाने मुसळधार सरीसोबत हजेरी लावली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाळा सुरु होण्याची अगदी चातकासारखी वाट बघत होते. अखेर पावसाच्या दमदार हजेरीनंतर जो तो सुखावला आहे. पावसाळ्यात निसर्गाचे रूप अगदी पाहण्यासारखे आणि डोळ्यात साठवण्यासारखे असते.

अशा या सुंदर आणि आल्हाददायी मोसमात फिरायला जावे, असे प्रत्येकाला वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुंबई- पुण्याच्या अगदी जवळ असणाऱ्या अत्यंत सुंदर ठिकाणाबाबत माहिती देणार आहोत. ते म्हणजे माथेरान. पावसाळ्यात माथेरान फिरायचा म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती. चला तर माथेरानविषयी अधिक जाणून घेऊया.

स्वर्गसुखाची अनुभूती देणारे माथेरान (Matheran)

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक छोटेसे हिल स्टेशन म्हणजे माथेरान. मुंबई आणि पुणेकरांसाठी हे ठिकाण अत्यंत जवळ आहे. शिवाय कोणत्याही ऋतूमध्ये इथे जाणे मनाला दिलासा देणारे ठरते. शिवाय रोजची धावपळ, गोंधळ आणि प्रदूषणाने मलीन झालेल्या वातावरणापासून मुक्तता देणारे हे प्रदूषण मुक्त हिल स्टेशन आहे. शिवाय इथे जायला फार खर्च करावा लागत नाही. अत्यंत सुंदर, नेत्रदीपक दृश्य आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समृद्ध अशा या ठिकाणी गेल्यानंतर आपण स्वर्गात आलो का काय? असेच वाटते.

त्यात पावसाळ्यात माथेरानला गेलात तर इथले नैसर्गिक सौंदर्य १०० पटीने वाढलेले दिसते. (Matheran) सर्वत्र हिरवळ, खोल दऱ्या, लहान मोठे धबधबे, थंडगार हवा, शुभ्र धुक्याची चादर आणि त्यात रिमझिम सरी..अहाहा! असे वातावरण क्षणात मनावरील ताण दूर करण्यास मदत करते. त्यामुळे पोवसाळ्यात माथेरानला आवर्जून जावे.

कसे जाल?

माथेरानला जाताना नैसर्गिक सौंदर्य न्याहाळत जायचे असेल तर, तुम्ही नेरळ स्टेशनवरुन टॉय ट्रेनने प्रवास करू शकता. या टॉय ट्रेनच्या नियोजित वेळा असतात. त्यामुळे वेळ चुकली तर किमान तासभर वाट पहावी लागते. (Matheran) टॉय ट्रेनची खासियत म्हणजे, ही ट्रेन सुमारे २० किलोमीटर अंतर अत्यंत वळणदार रस्त्यांवरून कापत जाते. त्यामुळे आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य फारच आकर्षित करणारे ठरते. मात्र, या ट्रेनमधून प्रवास कारताना पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

महत्वाचे असे की, पावसाळ्यात टॉय ट्रेन बंद असू शकते. अशावेळी तुम्ही येथे प्रायव्हेट टॅक्सीने जाऊ शकता. माथेरानमध्ये दस्तुरी पॉइंटच्या पुढे तुम्हाला साधारण अडीच किलोमीटर अंतर हे पायी कापावे लागते. (Matheran) यावेळी निसर्गाचे असे काही दर्शन होईल की, पाहता पाहता तुम्ही त्यात हरवून जाल.

काय पाहाल?

माथेरान हे एक असे हिलस्टेशन आहे जिथे खोल दऱ्या आणि डोंगर पाहताना डोळ्यातली चमक आपोआप वाढते. इथे पावसाळ्या दरम्यान ढगांनी वेढलेले पर्वत आणि कोसळणारे लहान मोठे धबधबे, सुंदर तलाव, उद्याने आणि अनेक वेगवेगळे पॉइंट्स पाहणे मनाला आनंद देणारे ठरते. (Matheran) माथेरानला गेले असता शार्लोट लेक, पॅनोरमा पॉईंट, सनसेट पॉईंट, पॉर्च्यूपॉईन, लुईझा पॉईंट, एको पॉईंट, चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, गार्बट पॉईंट अशा विविध लोकप्रिय लोकेशन्सला जरूर भेट द्या.