महाराष्ट्रातील नावाजलेले हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे. उंच डोंगरदऱ्यात वसलेलं माथेरान आजही पर्यटकांची पसंती आहे. माथेरान मधील महत्वाचे आकर्षण म्हणजे माथेरानची राणी… ! माथेरानची ट्रेन. माथेरानची ही ट्रेन पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद असते. मात्र येत्या १ नोव्हेंबर पासून ही ट्रेन पुन्हा धावणार आहे. त्यामुळे पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेनची सफर करता येणार आहे.
तांत्रिक बाबींमुळं विलंब
पावसाळ्याच्या दिवसात या भागात जास्त पाऊस पडत असल्यामुळे येथे घाट माथ्यावर दरडी कोसळण्याची भीती असते. म्हणूनच पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी तांत्रिक बाबींमुळं ही सेवा सुरु होण्यास विलंब होत आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या १ नोव्हेंबर पासून माथेरान ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे.
दिवाळीच्या आणि नाताळाच्या सुट्टीनिमित्त हजारो पर्यटक माथेरानला भेट देत असतात. हा पर्यटन हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत चालतो. त्यामुळे रेल्वेला देखील चांगला महसूल यातून मिळत असतो. दरम्यान, 15 ऑक्टोबरची तारीख उलटून गेल्यानंतरही माथेरानची राणी रुळांवर न आल्याने पर्यटकांसह व्यावसायिकांनाही फटका बसला आहे.
दररोज होणार 8 फेऱ्या
सध्या या गाडीच्या दररोज आठ फेऱ्या आहेत. या गाडीची खास बात म्हणजे या ट्रेनमधून माथेरानचं निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते. पर्यटन खासकरुन या ट्रेनची सफर करण्यासाठीच येतात. मात्र फेऱ्या मर्यादित असल्याने अनेकदा पर्यटकांचा हिरमोड होतो.