‘लाल माती, निळं पाणी..’; MHJ फेम कोकण कोहिनुर झळकले सप्तसूरच्या नव्या गाण्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे आणि मुख्य म्हणजे कोकणात जाण्याचे… कोकण मुळातच इतकं सुंदर आहे की त्याची ओढ लागतेच. म्हणूनच सप्तसूर म्युझिकने कोकणाचे सौंदर्य दाखवणारा एक नवाकोरा कमालीचा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून या गाण्यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेले कोकण कोहिनुर अभिनेते प्रभाकर मोरे झळकले आहेत. त्यांच्यासोबत वैष्णवी जोशी देखील मध्यवर्ती भूमिकेत दिसते आहे.

सुंदर कोकणराज..’

या नव्याकोऱ्या गाण्याचे बोल ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे काहीसे आहेत. या म्युझिक व्हिडिओमध्ये कोकणातील सुंदर हिरवी झाडी, माडाची उंच झाडं, सुपारीच्या बागा, निळंशार पाणी, लाल माती, कौलारू घरांची सुंदर दृश्य दाखवण्यात आली आहेत. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी कोकणराज या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. मंगेश केरकर यांनी गीतलेखन केलं आहे. संगीत संयोजन कलमेश भडकमकर यांचं आहे. कृतिक माझिरे यांनी कोरिओग्राफी आणि दिग्दर्शन केलं आहे.

सुंदर कोकणराज | Sunder Kokanraj | Official Song | Prabhakar More, Vaishnavi Joshi | Milind Ingale

कोकणी भाषेचा गोडवा

या गाण्याच्या माध्यमातून कोकणी भाषेचा गोडवा आणि शब्दातील माया अनुभवायला मिळत आहे. गाण्यामध्ये कोकणी पद्धतीचे गाऱ्हाणे देखील आपल्याला ऐकू येत आहे. जे मनोहर गोलांबरे यांनी विशेष पद्धतीने गाण्यात घातले आहे. त्यामुळे एकंदरच हे गाणे कोकणी माणसाच्या काळजाला हात घालणारे ठरत आहे. सप्तसूर म्युझिकने आतापर्यंत अनेक गाणी केली आहेत. जी कायम प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. यातच आता ‘सुंदर कोकणराज’ या गाण्याची देखील भर पडली आहे.

कोकणी माणसाच्या जगण्याची गोष्ट

गावच्या वेशीवरचा वेताळ, आजीच्या हातच्या घासापासून कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन या म्युझिक व्हिडिओत घडवण्यात आलं आहे. म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून कोकणी जगण्याची जणू गोष्टच सांगण्यात आली आहे. अतिशय श्रवणीय असलेल्या या गीताला प्रभाकर मोरे आणि वैष्णवी जोशी यांच्या अभिनयानं आणखी खुलवलं आहे. त्याशिवाय नेत्रसुखद चित्रीकरणाचीही त्याला जोड लाभलीय. त्यामुळे प्रत्येकाला हा म्युझिक व्हिडिओ आपलासा वाटेल यात शंका नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात कोकणाची संस्कृती अनुभवासाठी कोकणराज म्युझिक व्हिडिओ पाहायलाच हवा.