Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट उद्यापासून (11 फेब्रुवारी) तब्बल 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. हा निर्णय कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास (Mumbai-Pune Expressway) बांधले जात आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विस्तारीकरण प्रकल्प
वाढत्या वाहनसंख्येमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विस्तारीकरण प्रकल्प सुरू आहेत. अतिरिक्त लेन आणि बायपास रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे.
कलंबोली सर्कल येथे नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास प्रकल्प हा याचाच भाग आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला 6-लेन, प्रवेश-नियंत्रित महामार्गआहे. 94.5 किमी लांब असलेला हा महामार्ग मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ फक्त 2 ते 2.5 तासांवर घेऊन आला आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या महामार्गामुळे जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-48) वरची वाहनकोंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान पनवेल एक्झिट बंद असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास सुकर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वाहनचालकांवर परिणाम (Mumbai-Pune Expressway)
पनवेल एक्झिट बंद झाल्याने लहान-मोठी वाहने आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकवर परिणाम होणार आहे. विशेषतः पनवेल, मुंब्रा आणि जेएनपीटी (JNPT) कडे जाणाऱ्या वाहनांना याचा सर्वाधिक फटका बसेल. नवी मुंबई वाहतूक विभागाने वाहतूक व्यवस्थापनासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
पर्यायी मार्ग (Mumbai-Pune Expressway)
पनवेल, गोवा आणि JNPTकडे जाणारी वाहने कोनफाटा येथे पळस्पे सर्कल मार्गे NH-48 वर वळवली जातील. पुण्याहून मुंबईकडे येणारी व तलोजा, कल्याण, शिळफाट्याकडे जाणारी वाहने रोडपाली आणि NH-48 मार्गे प्रवास करू शकतील.
वाहनचालकांसाठी सूचना
वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना सुचवलेल्या मार्गांचे अनुसरण करावे.
मार्गदर्शनासाठी साइनबोर्ड लावण्यात येतील आणि वाहतूक पोलीस तैनात असतील.
- प्रवाशांना बांधकाम प्रगतीबद्दल नियमित अपडेट्स दिल्या जातील.
- विलंब टाळण्यासाठी, पर्यायी मार्गांचा वापर करावा.