मुंबई-पुणे प्रवास म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची जाणीव करून देणारा अनुभव. उंचच उंच डोंगररांगा, वळणावळणांचे रस्ते आणि एका क्षणात बदलणारे निसर्गाचे रंग—हे सगळं अनुभवत पुण्यापर्यंत पोहोचण्याचा आनंद वेगळाच असतो. पण या निसर्गसंपन्न मार्गावर गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली होती. यावर तोडगा काढण्यासाठी आता एक मोठी घोषणा झाली आहे – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आता आठ पदरी होणार आहे.
वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा, प्रवास आणखी वेगवान
सध्या एक्स्प्रेसवेवर तीन लेन प्रवासासाठी आणि तीन लेन परतीसाठी अशा एकूण सहा मार्गिका आहेत. मात्र, वाढत्या वाहनसंख्येमुळे सुट्टीच्या दिवशी आणि पीक तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. विशेषतः अमृतांजन पुलाजवळ आणि घाट क्षेत्रात ही समस्या अधिक जाणवते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी दोन्ही बाजूंना एक-एक नवीन लेन जोडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर हे काम वेगाने सुरू होईल.
75 किमी लांबीचा महामार्ग होणार आठ पदरी
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रोज सरासरी 50,000 ते 60,000 वाहने धावतात. यातील घाट क्षेत्रात 13 किमी लांबीचा “मिसिंग लिंक” प्रकल्प आधीच आठ पदरी करण्यात आला आहे. त्यामुळे आता उर्वरित 75 किमी महामार्गही आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या नव्या मार्गिकांमुळे विशेषतः अमृतांजन पुलानजीकच्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार आहे.
कधी होईल प्रत्यक्ष काम सुरू?
राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाला गती मिळेल. एकदा काम सुरू झाल्यानंतर भविष्यात मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होईल. आता हा प्रकल्प कधी पूर्ण होतो आणि वाहनचालकांना कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद कधी मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.