पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 23 ऐवजी 32 मेल एक्स्प्रेस गाड्या वांद्रे टर्मिनसवरून दररोज गावासाठी रवाना होतील. वांद्रेहून सुटणाऱ्या अधिक गाड्यांचा सर्वाधिक फायदा उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना होईल. वांद्रे टर्मिनसपासून रेल्वे सेवा विस्तारण्यासाठी रेल्वेकडून पुढील काही महिन्यांत तीन नवीन पिट लाईनचे काम पूर्ण केले जाणार आहे.
पिट लाईन पूर्णत: तयार झाल्यानंतर येथून दररोज 9 अतिरिक्त एक्स्प्रेस गाड्या गावाकडे जातील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 9 अतिरिक्त गाड्यांपैकी बहुतांश गाड्या उत्तर भारताच्या दिशेने चालवल्या जातील. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांचा तिकीटाचा त्रास कमी होणार आहे. वांद्रे टर्मिनसवर तयार करण्यात येणाऱ्या तीन पिट लाइनपैकी एक पिट लाइन फेब्रुवारीपर्यंत, दुसरी पिट लाइन मार्चपर्यंत आणि तिसरी पिट लाइन मेपर्यंत तयार होणे अपेक्षित आहे.
मे महिन्यापर्यंत तिन्ही लाइन तयार होणे अपेक्षित
तिन्ही पिट लाईन तयार करण्यासाठी पश्चिम रेल्वे सुमारे 40 कोटी रुपये खर्च करत आहे. पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांच्या मते, तीन पिट लाइन तयार झाल्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी अतिरिक्त गाड्या चालवण्याची योजना आहे. सध्या वांद्रे टर्मिनस ते यूपी, बिहारसाठी १९ गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. पिट लाईन बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही महिन्यांत म्हणजे मे महिन्यापर्यंत सर्व पिट लाइन्स तयार होतील, अशी अपेक्षा आहे.
प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर
पिट लाइन तयार करण्यासाठी प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासाठी राममंदिर, दादर, अंबरनाथ आणि नागपूर येथून पिट लाइन्स उभारण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात येत आहेत. प्री-फेब्रिकेटेड टेक्नॉलॉजीमध्ये, वेगवेगळ्या रचना तयार केल्यानंतर, ते साइटवर आणले जातात आणि स्थापित केले जातात. या तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत जलद गतीने काम पूर्ण करणे शक्य होत आहे.