Naldurg Fort : महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यात कोसळतात नर- मादी धबधबे; चहूबाजूंनी डोंगर करतात संरक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Naldurg Fort) महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. प्रत्येक किल्ला हा इतिहासातील कोणत्या ना कोणत्या घटनेचा साक्षीदार आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी आणि ट्रेकर्स असे अनेक किल्ले सर करण्यासाठी कायमच जाताना दिसतात. अशाच एका किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जो इतिहासाचा साक्षीदार तर आहेच. शिवाय त्याचे वैशिष्ट्य अत्यंत खास आहे. महाराष्ट्रातील या किल्ल्याविषयी अनेक लोकांना माहीत असेल, अनेकांनी हा किल्ला पाहिला देखील असेल. मात्र याचं ऐतिहासिक महत्त्व अत्यंत थक्क करणार आहे. ज्याविषयी फार कमी लोक जाणतात. आपण ज्या किल्ल्याविषयी बोलतोय त्या किल्ल्याचे नाव आहे ‘नळदुर्ग’. चला तर जाणून घेऊया नळदुर्ग किल्ल्याविषयी सविस्तर माहिती.

कुठे आहे नळदुर्ग? (Naldurg Fort)

नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी एक सर्वात मोठा किल्ला आहे. जो धाराशिव अर्थात पूर्वीचे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंना पूर्णपणे पाण्याने वेढा घातलेला आहे. तर किल्ल्याच्या चौथ्या बाजूला खोल दरी आहे. नळदुर्ग हा किल्ला ज्या डोंगरावर बांधलेला आहे त्या डोंगराच्या चहूबाजूंनी इतर डोंगर आहेत. यामुळे किल्ला पाहताना आजूबाजूचे डोंगर या किल्ल्याचे संरक्षण करत आहेत का काय? असे भासते. शिवाय या डोंगरांची उंची इतकी जास्त आहे की जवळ गेल्याशिवाय नळदुर्ग दिसत नाही. सुमारे तीन किलोमीटरवर पसरलेला हा किल्ला पर्यटकांसाठी नेत्रदीपक ठरतो.

वैशिष्ट्यपूर्ण नळदुर्ग

नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत आहे. हा किल्ला काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला आहे. तसेच या किल्ल्यात एकूण ११४ बुरुज आहेत. ज्यांना परांडा बुरुज, उपळा बुरुज, अण्णाराव बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज अशी वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. या किल्ल्यावरील परांडा बुरुज हा किल्ल्याच्या उत्तर पूर्व बाजूला आहे. (Naldurg Fort) त्याकाळी या बुरुजावरून एक मोठा झेंडा किंवा मशालीच्या सहाय्याने परांडातील लोकांना संदेश दिला जायचा. येथील ‘हुलमुख दरवाजा’ या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याची संपूर्ण रचना नीट पाहिली तर समजते की, शत्रूला चकवा देता येईल अशी याची उभारणी केली गेली आहे. याचा मूलभूत पुरावा म्हणजे गडाचे दरवाजे.

किल्ल्यावर प्रवाहित होणारे नर- मादी धबधबे

नळदुर्गावरील नर-मादी धबधबे जमिनीपासून ९० फूट उंचीवर आहेत. इब्राहीम आदिलशहा (दुसरा) याच्या काळात मीर मुहम्मद इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने या वास्तूचा आराखडा तयार केला होता. (Naldurg Fort) यासाठी त्याने बोरी नदीचे पाणी वळवून एक बंधारा बांधला आणि यात पाणी महाल ही वास्तू बांधली. पावसाळ्यात बोरी नदीचा जलस्तर वाढला की, धरणाच्या दोन्ही बाजूला सांडव्यातून पाणी वाहते. या दोन कृत्रिम धबधबधब्यांना ‘नर’ व ‘मादी’ या नावाने ओळखले जातात.

प्रेक्षणीय पाणी महाल

मीर मुहम्मद इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने १६१३ मध्ये बोरी नदीने पाणी वाळवून बांधलेल्या बंधाऱ्यात पाणीमहाल उभारला. या महालात उतरण्यासाठी बंधाऱ्यावरून पायऱ्यादेखील बांधलेल्या आहेत. नळदुर्ग आणि रणमंडळ किल्ले हे या पाणी महालाने जोडले आहेत. माहितीनुसार, सदर पाणी महाल हा कायम थंडगार असतो. (Naldurg Fort) इथे कोणत्याही एसीची गरज नाही. हा पाणीमहाल अत्यंत प्रेक्षणीय आहे. बोरी नदीचं संपूर्ण पात्र वळवून त्याचा उपयोग या किल्ल्याच्या रक्षणासाठी केल्याचे आपण पाहू शकतो.

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास

नळदुर्ग किल्ल्याचा संबंध नळ- दमयंती यांच्यासोबत जोडलेला आहे. तारीख-ए-फरिश्ता ग्रंथातदेखील नळदुर्ग किल्ल्याचा उल्लेख आहे. यानुसार, नळदुर्ग हा किल्ला राजा नळ याने आपल्या मुलासाठी बांधल्याचे म्हटले आहे. हा किल्ला काही काळ चालुक्य राजाच्या आधीन होता. (Naldurg Fort) त्यानंतर बहामनी सुलतानांनी तो काबीज केला. मात्र बहामनी राज्यांच्या विघटनानंतर हा किल्ला आदिलशाहाकडे गेला. पुढे मुघल आणि निजामांनी देखील यावर आपले वर्चस्व गाजवले. मात्र इ. स. १७५८ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी नळदुर्ग जिंकला होता.

नळदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी असा करा प्रवास

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात पुणे – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर हा किल्ला स्थित आहे. सोलापूरहून हैदराबादकडे निघाल्यावर ४८किमी अंतरावर नळदुर्ग गाव आहे. किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्थानक सोलापूर असल्यामुळे तुम्ही सोलापूरहून अधिक लवकर नळदूर्ग किल्ल्यावर जाऊ शकता. तसेच हा किल्ला सोलापूरच्या स्थानिक बस स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे रेल्वे किंवा बस दोन्हीने प्रवास करता येईल. (Naldurg Fort)