हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नासाच्या (NASA) पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळ ग्रहावर एक थक्क करणारा शोध लावला आहे. जेजेरो क्रेटर परिसरातील विच हेजल हिल टेकडीच्या उतारावर संशोधन करत असताना रोव्हरला एक “सोन्यासारखी” टेकडी आढळून आली आहे. यामुळे संपूर्ण वैज्ञानिक समुदायात उत्सुकता निर्माण झाली आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीतील प्रमुख शास्त्रज्ञ केटी मॉर्गन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सिल्व्हर माऊंटन’ नावाची ही टेकडी सुमारे 3.9 अब्ज वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झाल्याचा अंदाज आहे. ही टेकडी व तिच्याजवळील परिसरात सापडलेल्या खनिजांचा रंग अन चमक सोन्यासारखी असून, त्यामुळे तिला ‘सोन्याची टेकडी’ म्हणून संबोधले जात आहे.
83 टेकड्यांचे परीक्षण, 5 ठिकाणांहून नमुने –
डिसेंबर 2024 पासून पर्सिव्हरन्स रोव्हर जेजेरो क्रेटरच्या टेकड्यांवर भ्रमंती करत आहे. या मोहिमेदरम्यान, 83 टेकड्यांवर लेझर तंत्रज्ञानाद्वारे परीक्षण करण्यात आले असून 5 ठिकाणांहून दगड व मातीचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये ‘सर्पेंटाइन’ नावाचे महत्त्वाचे खनिजही आढळले आहे, जे पाणी आणि ज्वालामुखीच्या संपर्कातून तयार होते आणि हायड्रोजन निर्माण करते जे पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यावश्यक घटक आहे.
पृथ्वीवर आणणार का हे ‘सोनं’? –
मंगळावरून हे मौल्यवान खनिज पृथ्वीवर आणणे हे पुढील पाऊल असणार आहे, मात्र हे काम अत्यंत खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्यामुळे नासाने विशेष योजना आखण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेद्वारे भविष्यात मंगळावरील मानवी वसाहतीसाठी आवश्यक संसाधने मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
संशोधनाला नवे वळण –
या संशोधनामुळे मंगळावरील प्राचीन जीवनाच्या शक्यतेवर नव्याने प्रकाश पडत आहे. मॉर्गन म्हणाल्या, “विच हेजल हिल अजूनही अनेक रहस्ये लपवून ठेवून आहे.” रोव्हरने गोळा केलेल्या डेटाच्या आधारे आगामी संशोधनाचे दिशानिर्देश निश्चित केले जाणार आहेत. जेजेरो क्रेटर परिसरातील हे शोध मंगळावरील भूगर्भशास्त्र आणि इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहेत. पर्सिव्हरन्सची हालचाल, नमुने संकलन आणि तांत्रिक निरीक्षणे यामुळे संशोधनाला नवे वळण मिळाले आहे.