आजकाल आधार कार्ड हे व्हेरिफिकेशनसाठी सगळीकडे अनिवार्य ठरले आहे. कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी, हॉटेल्सपासून विमानतळापर्यंत, आधार कार्ड किंवा त्याची झेरॉक्स घेऊन फिरणे आता एक साधारण गोष्ट झाली आहे. मात्र, यामुळे अनेकांना अस्वस्थता आणि गैरसोय निर्माण होऊ शकते.
पण आता याच समस्येवर एक समाधान मिळालं आहे. आधार कार्डचे व्हेरिफिकेशन अधिक सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी एक नवीन ॲप लाँच करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी या ॲपबद्दल माहिती दिली आणि स्पष्ट केले की यामुळे आता आधार कार्ड किंवा त्याची प्रत घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही.
डेटा सुरक्षित ठेवण्याची गॅरंटी आणि सोपा वापर
सध्या बीटा व्हर्जनमध्ये असलेले हे ॲप युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे चाचणी केली जात आहे. मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, “आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया आता UPI प्रमाणेच सोपी होईल.” यासाठी, वापरकर्त्यांना QR कोड स्कॅन करून, सेल्फी कॅमेऱ्याद्वारे चेहऱ्याची पडताळणी करावी लागेल. यामुळे, आधार कार्डवरील सर्व तपशील दुसऱ्या व्यक्तीला देण्याची आवश्यकता राहणार नाही.
डेटा गोपनीयतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
आधार कार्ड घेऊन फिरण्याने अनेकदा तुमचा वैयक्तिक डेटा लीक होण्याचा धोका असतो. जर आधार कार्डाची झेरॉक्स दुसऱ्या व्यक्तीला दिली, तर आधारवरील सर्व माहिती त्या व्यक्तीला मिळू शकते. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मात्र, नवीन ॲपद्वारे ही समस्या दूर केली जाईल, कारण केवळ आवश्यक असलेले तपशीलच संबंधित व्यक्तीला शेअर केले जातील.
आधार ॲपमध्ये काय खास?
- फेस आयडी आणि QR स्कॅनिंग: आधार ऑथेंटिकेशन आता डिजिटल पद्धतीने होईल, त्यामुळे आधार कार्ड किंवा त्याची झेरॉक्स घेऊन फिरण्याची आवश्यकता राहणार नाही.
- गोपनीयता वाढेल: वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय डेटा शेअर केला जाणार नाही. त्यामुळे गोपनीयतेची अधिक काळजी घेतली जाईल.
- फसवणूक थांबवेल: नवीन ॲप वापरल्याने आधार कार्डची माहिती सुरक्षित राहील आणि फसवणूक अथवा एडिटिंगला थांबवता येईल.
या नव्या ॲपमुळे ज्या पद्धतीने आधार कार्ड वापरले जाते, ती अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. हॉटेल्स, विमानतळांसारख्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डाची प्रत देण्याची आवश्यकता नाही, आणि तुमच्या आधार कार्डशी संबंधित डेटा लीक होण्याची शक्यता देखील कमी होईल.




