हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आयुर्विमा महामंडळ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते . नुकतेच त्यांनी ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स प्लॅन लाँच केला असून , यामध्ये विमाधारकांना 2 लाखापर्यंत विमा कव्हर मिळू शकते. ही योजना सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, लहान वित्त संस्था आणि गैरसरकारी संस्था (NGOs) यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अनेक गट घेऊ शकतात. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार एलआयसीच्या योजनांना प्राधान्य देतात. यामधील गुंतवणुकीमुळे चांगला नफा तसेच विमा कव्हर देखील मिळतो .
कोणाला लाभ घेता येईल
या योजनेचा लाभ 50 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या गटाला होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एकदाच प्रीमियम भरावा लागतो. तसेच पॉलिसीधारकाला एका महिन्यापासून ते दहा वर्षापर्यंतचा कालावधी निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही . तसेच एकाच संस्थेमध्ये पती आणि पत्नी काम करत असतील तरीही त्या दोघांनाही लाभ घेता येईल.
किती विमा कव्हर मिळणार
ही योजना संस्थांमधील सदस्यांना अपघाती मृत्यूच्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळवून देण्यास मदत करते . पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो, तसेच कोणते कर्ज असल्यास तेही या पॉलिसीच्या माध्यमातून परत केले जाऊ शकते. यामध्ये पाच हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम कव्हर करण्यात आली आहे.
मॅच्युरिटी लाभ मिळणार नाही
ही योजना मॅच्युरिटी लाभ प्रदान करत नाही. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच कुटुंबाला पॉलिसीची रक्कम मिळते. मात्र अपघाती मृत्यू झाल्यासच नॉमिनीला संपूर्ण विमा रक्कम दिली जाते. अपघाता व्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यू झाल्यास कमी रक्कम दिली जाते. पॉलिसी रद्द होण्याचा ठराविक कालावधी ठरवला जातो . एखाद्या व्यक्तीने गट सोडल्यास किंवा वयोमर्यादा संपल्यास पॉलिसी रद्द केली जाते. तसेच पॉलिसी सरेंडर केल्यानंतर सुद्धा लाभ मिळत नाही आणि पॉलिसीचा कालावधी संपल्यावरही लाभ मिळत नाही .