महाराष्ट्र राज्यात इयत्ता ११वीसाठी यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया २१ मे २०२५ पासून सुरू होणार असून प्रथम फेरीत CAP (Centralized Admission Process) राउंडच्या माध्यमातून प्रवेश दिले जातील. त्यानंतर विविध कोटा अंतर्गत प्रवेशासाठी प्रक्रिया राबवली जाईल.
राज्य शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, २० मेपर्यंत प्रॅक्टिस सेशन ठेवण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अर्ज कसा भरावा, कॉलेज कसे निवडावे याचे प्रात्यक्षिक शिकवले जाईल. प्रत्यक्ष नोंदणी व कॉलेज पसंती नोंदवण्याची प्रक्रिया २१ मेपासून सुरू होईल. ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून ३१ मे व १ जून या दोन दिवसांत यादीवर हरकती व सुधारणा करता येतील. अंतिम गुणवत्ता यादी ३ जून रोजी जाहीर करण्यात येईल.
५ जून रोजी या यादीवर आधारित प्रवेश देतील. त्यानंतर ६ जून ते १२ जून या कालावधीत सर्व कागदपत्रांची पडताळणी व अपलोडिंगची प्रक्रिया राबवली जाईल. पहिल्या CAP राउंडनंतर १४ जूनपासून दुसऱ्या फेरीस सुरुवात होईल.शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. कारण मागील वर्षी अनेक वेळा ही प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत लांबली होती.
यंदा दहावीची पूरक परीक्षा जून-जुलैमध्ये घेतली जाणार आहे आणि त्याचे निकाल जुलै अखेरीस जाहीर होणार आहेत. त्यामुळे पूरक परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ११वी प्रवेशासाठी संधी मिळणार आहे, जेणेकरून त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
सर्व प्रवेशार्थींसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक
प्रत्येक वेळीप्रमाणे यंदाही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कोट्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामध्ये व्यवस्थापन कोटा, इन-हाउस कोटा आणि अल्पसंख्यांक कोट्याचा समावेश आहे. ज्या शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय आहेत, तेथे त्यांच्या विद्यार्थ्यांना इन-हाउस कोट्याअंतर्गत प्रवेश दिला जाईल. तसेच अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये सुमारे ५०% जागा कोट्याद्वारे भरल्या जातील आणि उर्वरित CAP राउंडद्वारे.
CAP राउंड किंवा कोट्याद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. ते विद्यार्थी पुढील राउंडमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. विभागाने कोटा प्रवेशासाठी ६ जूनपासून प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, काही अल्पसंख्यांक कॉलेजांनी आधीच जागांची अनधिकृत बुकिंग सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे, जे नियमबाह्य आहे. शिक्षण विभागाच्या नियमांनुसार, सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. याद्वारे प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.