Operation Sindoor :भारत सरकारने दहशतवादाच्या विरोधातील धोरण अधिक कठोर करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने समजते की, येणाऱ्या काळात जर भारतावर कुठलीही दहशतवादी कारवाई झाली, तर ती थेट ‘युद्ध’ समजली जाईल आणि त्याला तितक्याच ताकदीनं आणि वेगानं उत्तर दिलं जाईल.
ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने (Operation Sindoor) पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याची प्रचिती दिली.
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला हादरवलं
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यानंतर भारताने 6-7 मेच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार हवाई कारवाई केली. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने एकत्र येऊन पाकिस्तान व पीओकेतील 9 दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले.
India has decided that any future act of terror will be considered an Act of War against India and will be responded accordingly: Top GoI sources pic.twitter.com/zZSAXzu3o6
— ANI (@ANI) May 10, 2025
जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैयबा यांचे अड्डे बहावलपूर, मुरीदके, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. भारतीय सैन्याने ड्रोन, क्षेपणास्त्रं आणि लोइटरिंग म्युनिशन वापरून आपली ताकद दाखवून दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं त्या वीर स्त्रियांच्या सन्मानार्थ, ज्या पहलगाम हल्ल्यात आपल्या पतीला गमावून बसल्या.
सीमेवर गोळीबार, ड्रोन हल्ले
या कारवाईनंतर पाकिस्तानने एलओसीवर गोळीबार सुरू केला आणि पुंछ-राजौरी परिसरात संघर्षविरामाचे उल्लंघन केले. पाकिस्तानने भारतातील शहरांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिमने हे हल्ले हवेतच निष्प्रभ केले. बठिंडामध्ये एक पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आला, तर लाहोर-सियालकोट भागात भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. पाकिस्तानने नागरिक मृत्यूचे आरोप केले, मात्र भारताने स्पष्ट केलं की लक्ष्य केवळ दहशतवादी तळ होते.
मोठी अपडेट!! या 4 शहरांत होणार IPL चे सामने? BCCI निर्णय घेण्याच्या तयारीत
भारताची नवी भूमिका
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने स्पष्ट संदेश दिला आहे. “दहशतवाद केवळ गुन्हा नाही, तर भारतावरील युद्ध आहे. त्याचं उत्तर लष्करी कारवाईने दिलं जाईल.” हा निर्णय ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा भाग आहे आणि पाकिस्तानसारख्या देशांना खुली इशारा देणारा आहे. जर त्यांच्या भूमीवरून भारताविरुद्ध कारवाया सुरूच राहिल्या, तर भारत प्रत्येक अड्डा उद्ध्वस्त करेल.
जग भारताच्या पाठीशी, पाकिस्तान एकटा
‘ऑपरेशन सिंदूर’ला संयुक्त राष्ट्र आणि अनेक राष्ट्रांनी पाठींबा दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताच्या कारवाईला योग्य ठरवलं आणि शांततेचे आवाहन केलं. याउलट पाकिस्तानच्या तक्रारींना आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा पाठिंबा मिळालेला नाही, कारण त्यांची ‘दहशतवादाला पनाह’ ही भूमिका सर्वांनाच माहिती आहे.
“भारत आता शांत नाही बसणार”
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी स्पष्ट केलं की, “सीमेपलीकडून जर कुठली आक्रमकता झाली, तर भारतीय सैन्य कठोर उत्तर देईल.” ही भूमिका आता भारताच्या दृढ आणि निर्णायक नेतृत्वाची ओळख बनली आहे. जिथे कुठलाही दहशतवादी हल्ला थेट युद्ध समजला जाईल आणि त्याला संपूर्ण सामर्थ्याने उत्तर दिलं जाईल.




