Operation Sindoor : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) सुरु केलेल्या कारवाईने खळबळ उडवून दिली आहे. ७ मेच्या मध्यरात्री सुरू झालेल्या या धडक हवाई हल्ल्यात भारतीय लष्कराने लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यामध्ये आठ हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले, तर ९ ठिकाणांवर दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले.
या कारवाईमध्ये कोणकोणते दहशतवादी ठार झाले, यावर आधीपासूनच अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता पाकिस्तानातून आलेल्या वृत्तांनुसार, या हल्ल्यांमध्ये पाच अत्यंत महत्त्वाचे दहशतवादी मारले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व दहशतवादी पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेशी आणि कुख्यात दहशतवादी संघटनांशी थेट संबंधित होते.
मुदस्सर खादियन खास ऊर्फ अबू जुंदाल
पहिला म्हणजे मुदस्सर खादियन खास ऊर्फ अबू जुंदाल, जो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. त्याच्या मृत्यूनंतर पाकिस्तान लष्कर आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पुष्पचक्र अर्पण करून अधिकृत मानवंदना दिली.
हाफीज मुहम्मद जमील
हाफीज मुहम्मद जमील, जैश-ए-मोहम्मदचा सदस्य होता आणि मसूद अजहरचा मेहुणा होता. बहावलपूरमधील एक दहशतवादी केंद्र तो चालवत होता आणि नव्या युवकांना दहशतवादात ओढण्याचं काम करत होता.
मोहम्मद युसूफ अझहर ऊर्फ उस्तादजी
तिसरा मोठा दहशतवादी मोहम्मद युसूफ अझहर ऊर्फ उस्तादजी, जो जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षक होता. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांमध्ये त्याची भूमिका होती.
खालिद ऊर्फ अबू आकाशा
चौथा खालिद ऊर्फ अबू आकाशा, लष्करशी संबंधित असून अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत असे आणि जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये सहभागी होता. त्याच्या अंत्यविधीला पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मोहम्मद हसन खान
पाचवा म्हणजे मोहम्मद हसन खान, जैश-ए-मोहम्मदचा POK मधील ऑपरेशनल कमांडर. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची आखणी करणारा तो प्रमुख ब्रेन होता. त्याचा खात्मा भारतासाठी मोठं यश मानलं जात आहे.
भारताची ही कारवाई एक दिवसापुरती नव्हती. अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरु आहे आणि भारतीय लष्कर दहशतवादी ठिकाणांचा शोध घेऊन त्यांचा नाश करत आहे. पाकिस्तानने ज्या दहशतवाद्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती दिली आहे, तीच भारताच्या ऑपरेशनच्या अचूकतेचा पुरावा ठरते.
पाकड्यांच्या डोक्यात अणुबॉम्बचा प्लॅन?? शरीफ यांच्या बैठकीत काय ठरलं?




