Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीला वेग आला असून, तपास यंत्रणांनी पाच दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. यामध्ये तीन पाकिस्तानी नागरिक आणि दोन जम्मू-कश्मीरमधील स्थानिकांचा समावेश आहे. गेल्या दोन दशकांतील एक मोठा हल्ला मानल्या जाणाऱ्या या घटनेमागे असलेल्या कटकर्त्यांना पकडण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
दहशतवाद्यांची नावे
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, तीन पाकिस्तानी (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांची नावे अशी आहेत – आसिफ फौजी (कोड नाव मूसा), सुलेमान शाह (कोड नाव यूनुस), आणि अबू तल्हा (कोड नाव आसिफ). तर उर्वरित दोन दहशतवादी – आदिल गुरी (अनंतनागच्या बिजबेहराचा रहिवासी, २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला होता) आणि अहसान (पुलवामाचा रहिवासी, तो देखील २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला होता) यांचीही ओळख पटली आहे.
हे सर्व दहशतवादी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन भारतात घुसले होते. फौजी आणि शाह हे यापूर्वीपासूनच जम्मू-कश्मीरमध्ये सक्रिय होते आणि पुंछमधील हल्ल्यांसह इतर घटनांमध्ये सामील असल्याची माहिती आहे.
उर्दू भाषेत संवाद, नंतर थेट गोळीबार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी नागरिकांशी उर्दू भाषेत संवाद साधत, धार्मिक ओळख संबंधित निर्देशांचे पालन न करणाऱ्यांना जवळून गोळी घालून ठार केले.
हल्ल्यानंतर पीर पंजालच्या डोंगरांकडे पलायन
हल्ला झालेल्या बैसरन परिसरात कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तपासासाठी वाचलेल्या नागरिकांच्या साक्षींवरच भर द्यावा लागत आहे. संशय आहे की, दहशतवादी हल्ल्यानंतर पीर पंजालच्या उंच डोंगरांकडे पळाले.
हाफिज सईदच्या सहकाऱ्याचीही चौकशी सुरू
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचा सहकारी सैफुल्ला कसुरी याची भूमिका तपासली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कसुरीने २ फेब्रुवारी २०२५ रोजी “कश्मीर २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पवित्र भूमी बनेल” आणि “मुजाहिद्दीन लवकरच हल्ले वाढवतील आणि कश्मीरला मुक्त करतील” असे वक्तव्य केल्याचे दिसते.




