पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव ही नवीन गोष्ट नाही, पण या तणावाला एका नीतीच्या स्वरूपात वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने केला जातो. ‘ब्लीड इंडिया विथ थाउजंड कट्स’ म्हणजेच “भारताला हजार जखमा देत रक्तबंबाळ करा” ही पाकिस्तान लष्कराची धोरणात्मक नीती आहे, जी विशेषतः 1971 च्या युद्धानंतर तयार करण्यात आली. भारताकडून सलग तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर पाक लष्कराला हे लक्षात आलं की थेट युद्धात भारतावर विजय मिळवणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी छद्म युद्ध, म्हणजेच प्रॉक्सी वॉरचा मार्ग स्वीकारला.
हे धोरण राबवण्यामागे जनरल जिया उल हक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यांनी 1977 मध्ये झुल्फिकार अली भुट्टोंचा तख्तापलट करून सत्ता हाती घेतल्यानंतर पाक लष्कराला आणि प्रशासनाला इस्लामी कट्टरतेच्या मार्गावर वळवलं. याच काळात पाकिस्तानमध्ये ‘इस्लामिक वॉरफेअर’ संकल्पना जन्माला आली. काश्मीरसह भारताच्या इतर भागांत दहशतवाद पसरवण्याचा हेतू या धोरणामागे होता. यासाठी पाकिस्तानने ‘दावत-उल-इरशाद’ सारख्या संस्थांची स्थापना केली, जी पुढे ‘जमात-उद-दावा’ आणि त्याची सशस्त्र शाखा ‘लष्कर-ए-तैयबा’ यामध्ये परिवर्तित झाली. हेच हाफिज सईदचं नेटवर्क 2008 च्या मुंबई हल्ल्यामागे होतं.
पाकिस्तानने या संघटनांना केवळ पाठींबा दिला नाही, तर त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि सुरक्षा संस्थांशी संपर्कही उपलब्ध करून दिला. हेच संघटनं काश्मीरमधील आणि भारतातील विविध भागांतील हल्ल्यांचं नियोजन करतात. अलीकडेच झालेला पहलगाम हल्ला हे या धोरणाचं आणखी एक उदाहरण मानलं जातं. अशा हल्ल्यांमधून पाकिस्तानचा उद्देश भारतात भीतीचं वातावरण निर्माण करणं, अस्थिरता पसरवणं आणि काश्मीर मुद्यावर आंतरराष्ट्रीय लक्ष वेधणं असा असतो.
ही ‘हजार जखमांची’ नीती आता केवळ बॉर्डरवर मर्यादित राहिलेली नाही. सोशल मीडिया, फेक न्यूज, धार्मिक ध्रुवीकरण, आणि अंतर्गत तणाव यांचाही वापर करून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारतासाठी आजचं मोठं आव्हान केवळ सीमारेषेवर नाही, तर अंतर्गत सुरक्षेच्या पातळीवरदेखील आहे. देशाने फक्त लष्करी तयारीच नव्हे, तर सामाजिक ऐक्य, जागरूकता आणि जागतिक दबावाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या अशा नीतीचा सामना करावा लागणार आहे.
‘ब्लीड इंडिया विथ थाउजंड कट्स’ ही फक्त युद्धनीती नाही, तर भारताच्या स्थैर्यावर आणि शांततेवर सातत्याने हल्ला करण्याचा एक भयानक कट आहे, जो केवळ सजगतेने आणि एकतेनेच परतवता येईल.