पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 एप्रिल रोजी राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर भारताच्या पहिल्या ‘वर्टिकल लिफ्ट’ सी ब्रिज अर्थात नव्या पंबन पुलाचे उद्घाटन करणार आहेत. हा ब्रिज तामिळनाडूतील रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूमीशी जोडणारा आहे. या पुलाच्या माध्यमातून रेल्वे आणि मोठ्या जहाजांसाठी सहज वाहतूक शक्य होणार आहे. हा इंजिनीअरिंग क्षेत्रातील एक चमत्कार मानला जात असून, त्याची मजबूत रचना समुद्री वातावरणाचा सामना करण्यासाठी स्टेनलेस स्टील आणि पॉलीसिलोक्सेन पेंट वापरून करण्यात आली आहे. यामुळे या पुलाचे आयुर्मान जवळपास 58 वर्षे राहणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या ब्रिजमध्ये इलेक्ट्रो-मेकेनिकल लिफ्टिंग सिस्टम आहे, जी संपूर्ण पूल 17 मीटर उंच करू शकते, ज्यामुळे मोठ्या जहाजांना मार्ग मोकळा मिळेल.
1911 मध्ये झाला होता पहिला पंबन ब्रिज उभारण्याचा प्रयत्न
याआधीचा पंबन ब्रिज तब्बल 1911 मध्ये बांधला गेला होता आणि तो 1914 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तो ब्रिटिश सरकारने व्यापार वाढवण्यासाठी बांधला होता. त्याकाळी धनुषकोडी ते श्रीलंकेच्या तलाइमन्नार दरम्यान जहाज वाहतूक सुरू होती. मात्र, 1962 मध्ये आलेल्या प्रलयंकारी चक्रीवादळाने धनुषकोडी पूर्णतः उद्ध्वस्त केले आणि तेव्हापासून हा भाग निर्जन राहिला आहे.
1964 मध्ये आलेल्या सुनामीने समुद्रात बुडाली होती संपूर्ण ट्रेन
23 डिसेंबर 1964 रोजी एक महाभयंकर सुनामी पंबन बेटावर धडकली. त्या रात्री 653 क्रमांकाची पंबन-धनुषकोडी प्रवासी रेल्वे धनुषकोडीला जात होती. मात्र, तीव्र लाटांमुळे संपूर्ण ट्रेन समुद्रात वाहून गेली. सकाळी फक्त इंजिन पाण्यावर तरंगताना दिसले! या दुर्घटनेत 100 ते 250 जणांचा मृत्यू झाला होता.
‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांनी केला इतिहास
हा पूल पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यावर रेल्वे मंत्रालयाने तो पुन्हा बांधण्यास नकार दिला. मात्र, ई. श्रीधरन या प्रसिद्ध भारतीय अभियंत्याने स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात बुडालेले 126 गार्डर्स शोधून ब्रिज पुन्हा तयार केला.
नव्या पंबन ब्रिजची वैशिष्ट्ये
- 2019 मध्ये नव्या पुलाचे बांधकाम सुरू झाले
- 2.08 किलोमीटर लांबीचा हा ब्रिज जुन्या पुलापेक्षा 3 मीटर उंच आहे
- 99 स्पॅन असून मुख्य लिफ्टिंग स्पॅन 72.5 मीटर लांब आहे
- हा स्पॅन 17 मीटर उंच होऊ शकतो, जेणेकरून मोठी जहाजे सहज जाऊ शकतील
- डबल रेल्वे ट्रॅक असल्याने वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वे धावू शकतील भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा अभिमान
नव्या पंबन ब्रिजमुळे रामेश्वरम आणि दक्षिण भारताच्या इतर भागांमधील दळणवळण अधिक सुकर होणार आहे. या अभूतपूर्व अभियंत्याच्या चमत्काराचा 6 एप्रिलला उद्घाटन सोहळा पार पडणार आहे, आणि हा पूल भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे!