Pink Tax : पिंक टॅक्सच्या नावाखाली होतेय महिलांची फसवणूक; पहा काय आहे हा प्रकार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pink Tax) दैनंदिन जीवनात आपण शासनाने पुरवलेल्या सेवांबद्दल एक मोबदला देत असतो ज्याला सामान्य भाषेत ‘टॅक्स’ अथवा ‘कर’ असे म्हटले जाते. आणखी उलगडून सांगायचे तर, या प्रक्रियेत मोबदला म्हणून शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तु मिळेल अशी आशा न बाळगता कायदेशीरित्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच टॅक्स.

आतापर्यंत तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारचे कर भरले असतील. यात सेल्स टॅक्स, सर्विस टॅक्स, गिफ्ट टॅक्स, व्हॅल्यू ॲडेट टॅक्स, गुड अँड सर्विस टॅक्स, इन्कम टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स या नावांचा उल्लेख असेल. पण गेल्या काही काळापासून यांमध्ये ‘पिंक टॅक्स’ची (Pink Tax) भर पडली आहे. ज्याला विशेष करून महिला कडाडून विरोध करत आहेत. चला तर जाणून घेऊ ‘पिंक टॅक्स’ हा नेमका काय प्रकार आहे आणि त्याला विरोध का केला जातोय?

‘पिंक टॅक्स’ म्हणजे काय? (Pink Tax)

आतापर्यंत ऐकलेल्या सर्व टॅक्समध्ये ‘पिंक टॅक्स’ हा शब्द अत्यंत वेगळा आणि लक्षवेधी आहे. हा शब्द पहिल्यांदा २०१५ साली ऐकण्यात आला आणि तेव्हापासून न्यूयॉर्कमध्ये महिला- पुरुषांसाठी असणाऱ्या एकाच प्रकारातील गुणवत्तेच्या वस्तूंची तुलना करण्यात आली. दरम्यान स्पष्ट झाले की, या वस्तूंची किंमत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी आहे. पुरुषांच्या तुलनेत या वस्तू महिलांना अधिक किमतीने विकल्या जात होत्या. केवळ ‘पिंक टॅक्स’ या शब्दाखाली छुप्या स्वरूपात महिलांकडून अधिक रक्कम वसूल केली जात होती.

चढ्या किंमती लावून ‘पिंक टॅक्स’ची वसुली

‘पिंक टॅक्स’ हा सामान्यपणे महिला खरेदी करत असलेल्या वस्तूंवर आकारला जातो. मात्र, कायद्याच्या दृष्टीने असा कोणता टॅक्स किंवा अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. (Pink Tax) महिलांमध्ये विशेष आकर्षण असणाऱ्या वस्तू जसे की मेकअपचे सामान, नेलपेंट, दागिने, लिपस्टिक, परफ्युम, कपडे, बॅग आणि सॅनिटरी पॅड अशा वस्तूंवर अधिक किंमती लावून विकल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, काही वस्तू महिला आणि पुरुषांमध्ये सारख्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. जसे की केसाचे तेल, रेझर, कपडे, परफ्युम आणि बॅगसुद्धा.

दरम्यान या वस्तूंची विक्री होताना स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या किमतीने विकल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उदा., जर पुरुष ७० रुपयाला लिपबाम खरेदी करत असतील तर तसाच लिपबाम महिलांना १५० रुपयांना विकला जात आहे. Pink Tax शिवाय पुरुषांना केस कापण्यासाठी १०० रुपये लागतात पण विषय स्त्रियांच्या हेअर कटिंगचा असेल तर २०० रुपये हमखास घेतात. एकंदरच काय तर, विशेष करून सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत रकमेतील तफावत मोठ्या प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे गेल्या काही काळात पिंक टॅक्सला विरोध केला जातोय.

महिलांना वस्तू महाग स्वरूपात का विकतात?

‘पिंक टॅक्स’च्या नावाखाली महिलांकडून ज्यादा रक्कम वसूल केली जात असल्याचे समोर आल्यानंतर जगभरातून ‘पिंक टॅक्स’ला विरोध केला जात आहे. दरम्यान, महिलांकडून वस्तू खरेदी व सेवा प्रदान करतेवेळी अधिक रक्कम का वसूल केली जाते? असा सवाल उपस्थित होत असताना अनेक उत्पादकांनी विविध तर्क मांडले आहेत. (Pink Tax) त्यानुसार एका उत्पादकाने सांगितले की, महिलांच्या वस्तूंची किंमत जास्त असते. कारण, त्या बनवण्यासाठी अधिक खर्च येतो. महिला आणि पुरुषांसाठी एकच वस्तू तयार केली जात असली तरी ती तयार करतेवेळी वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. वस्तू समान दिसत असल्या तरी त्या तयार करण्यासाठी लागणारा खर्च वेगवेगळा असतो. परिणामी दोन्हींच्या किमतींमध्ये फरक दिसून येतो.

किरण मुझूमदारांच्या विधानाने वेधलं ‘पिंक टॅक्स’कडे लक्ष

आपल्या देशातील करप्रणाली लिंगाधारित भेदभावाचे समर्थन करीत नाही. मात्र वस्तूंच्या किंमती ठरवताना लिंगाधारित भेदभाव केला जातोय असा दावा अनेकांनी केला आहे. या प्रकाराला ‘पिंक टॅक्स’ (Pink Tax) असे म्हटले जाते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बायकॉन कंपनीच्या मालक किरण मुजुमदार शॉ यांनी एका टॅक्सचा उल्लेख केला होता. हा टॅक्स वेळीच जगभरात थांबवण्यात यायला हवा, अशी स्पष्ट भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पिंक टॅक्सची चर्चा जोरदार रंगली.