Pink Village In Maharashtra : गुलाबी शहर म्हणून भारतात जयपूरची मोठी ओळख आहे. गुलाबी रंग प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. पण आज आम्ही तुम्हला महाराष्ट्राला अशा एका गुलाबी शहराबद्दल सांगणार आहोत या गावाचा गुलाबी रंग केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून हे पूर्ण गावच एक आदर्श गाव बनलं आहे. यापूर्वी आदर्श, शाश्वत गाव म्हणून महाराष्ट्रातील ‘हिवरे बाजार’ चं नाव आवर्जून घेतलं जातं. पण आज आपण ज्या गुलाबी गावाबद्दल (Pink Village In Maharashtra) जाणून घेणार आहोत ते गाव सुद्धा काही कमी नाही. चला तर मग जाणून घेऊया…
सस्टेनेबल व्हिलेज (Pink Village In Maharashtra)
कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं शेळकेवाडी हे छोटंसं पण उठावदार गाव आज महाराष्ट्राच्या विकासाचा आदर्श म्हणून समोर आलं आहे. गुलाबी रंगाने नटलेली घरे, संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारी वस्ती, स्वच्छता मोहिमेत आघाडी आणि आत्मनिर्भर पाणी व कचराव्यवस्थापन . या सर्व गोष्टींमुळे हे गाव आज ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल व्हिलेज’च्या दिशेने झेप घेत आहे.
कधी दुर्लक्षित, आता देशासाठी आदर्श (Pink Village In Maharashtra)
शेळकेवाडीची ओळख काही वर्षांपूर्वीपर्यंत मागासलेलं, दुर्लक्षित गाव अशी होती. पंचायतीला केवळ २-३ लाख रुपयांचा विकास निधी मिळत असे. शासनाचा फारसा हस्तक्षेप नव्हता. पण गावकऱ्यांनी “सरकारची वाट पाहत न बसता आपणच बदल घडवूया” हा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून गावाचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाली.
झीरो वीजबिलाचं गाव
प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत शेळकेवाडीत सौरऊर्जेचे यंत्रणा बसवण्यात आली आहे. १०० घरे १ किलोवॅट सोलर सिस्टमवर चालतात आणि दोन मोठ्या घरांमध्ये २ किलोवॅटची प्रणाली कार्यरत आहे. गावातील प्रत्येक घर स्वतंत्र सौरऊर्जेवर चालतं. परिणामी, कोणीही वीजबिल भरत नाही. लोक स्वतंत्रपणे पंखे, वॉशिंग मशीन, मिक्सर, लाइट्स वापरतात आणि त्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.ही ऊर्जेतील आत्मनिर्भरता आजच्या डिजिटल युगात गावासाठी मोठी क्रांती ठरली आहे.
गुलाबी रंग: सौंदर्य नव्हे, एकतेचं प्रतीक (Pink Village In Maharashtra)
गावातील प्रत्येक घर गुलाबी रंगात रंगवलं गेलं आहे. यामागे केवळ सौंदर्यदृष्टी नाही तर गावकऱ्यांची एकजूट आणि समान ध्येयासाठीची बांधिलकी आहे. “गुलाबी रंग हा एकतेचं प्रतिक आहे. आम्ही ठरवलं की, रंगही एकसंध असावा जसं आमचं प्रयत्न एकसंध आहेत,” असं इथले गावकरी सांगतात.
शेळकेवाडीने स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श
प्रत्येक घर शौचालयाशी जोडलेलं आहे आणि ते बायोगॅस यंत्रणेशी जोडलेलं आहे.
घरातील ओला कचरा या यंत्रणेत वापरून गॅस तयार होतो, ज्यामुळे एलपीजी सिलिंडरवरील खर्च कमी झालाय.
सुका आणि प्लास्टिक कचरा ‘अवनी’ या संस्थेमार्फत वर्गीकृत व व्यवस्थापित केला जातो.
गावात उघड्यावर कुठेही कचरा दिसत नाही. गटारे झाकलेली आहेत, रस्ते स्वच्छ आणि सांडपाणी मोठ्या सेप्टिक टँकमध्ये सुरक्षितपणे वळवण्यात येतं.
या सगळ्या गोष्टींमुळे शेळकेवाडीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्य पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे.
पाणीपुरवठ्यासाठी ‘स्वतःचं धरण’ (Pink Village In Maharashtra)
पाण्याचा प्रश्न गावासाठी नेहमीच महत्त्वाचा होता. शासनाकडून अपेक्षा न ठेवता गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःचं धरण उभारलं. या धरणातून गावात पाणीपुरवठा केला जातो, ज्यामुळे शेती, जनावरं आणि घरगुती गरजांसाठी पाण्याची टंचाई मिटली आहे.
डिजिटल प्रशासन आणि आरोग्य सजगता
शेळकेवाडीच्या ग्रामपंचायतीने आता डिजिटल सेवांवर भर दिला आहे. शिक्षण, आरोग्य तपासणी, शासनाच्या योजनांचा लाभ घेणं हे सर्व आता डिजिटल स्वरूपात पार पाडलं जातं. गावातील (Pink Village In Maharashtra) नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढलेली असून, नियमित आरोग्य शिबिरं, लसीकरण आणि पाणी स्वच्छतेसाठी खास मोहीम राबवण्यात येतात.
गावकऱ्यांची जिद्द म्हणजेच यशाचं मूळ
हे यश मिळवताना कोणताही ‘बाहेरचा हिरो’ नव्हता. गावचेच लोक खरे नायक होते. त्यांनी शासनाच्या योजनांचा योग्य वापर करत, एकत्र येत, स्वतःचं गाव घडवलं. “पूर्वी आमचं नाव कोणी घेत नसे, पण आता शेळकेवाडीचं नाव आदर्श गाव म्हणून घेतलं जातं,” असं गावकरी अभिमानाने सांगतात.शेळकेवाडी हे केवळ एक छोटं गाव नाही, तर ही एक चैतन्यशील चळवळ आहे. ऊर्जेपासून स्वच्छतेपर्यंत, एकतेपासून डिजिटल साक्षरतेपर्यंत – हे गाव महाराष्ट्राचं आणि भारताचं स्वप्नवत मॉडेल बनलं आहे. ‘गाव पुढारतंय’ हे फक्त बॅनरवर न राहता प्रत्यक्षात उतरवायचं असेल, तर शेळकेवाडी हे सर्वोत्तम उदाहरण ठरू शकतं.